महाराष्ट्र
13853
10
शेवगाव- कचरा डेपोची आग अजूनही धुमसतेय; कचरा पेटला की पेटविला
By Admin
शेवगाव- कचरा डेपोची आग अजूनही धुमसतेय; कचरा पेटला की पेटविला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव नगरपरिषदेच्या कचरा डेपोची आग अजूनही धुमसत असून, सोमवारी दुसर्या दिवशीही कचर्याच्या ढिगार्यातून धुराचे लोट बाहेर पडत होते.
या धुराने आसपासच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रक्रिया होत नसलेल्या प्लॅस्टिक व चिंध्या याच्या ढिगार्याचा अनेक दिवसापासून लिलाव का झाला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे हा कचरा पेटला की पेटविला, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा आहे.
शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगत असलेल्या शेवगाव नगरपरिषदेच्या कचरा डेपोला रविवारी दुपारी आग लागली. येथील रखवालदार व मुकादमाने पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्लॅस्टिक कागद, बाटल्या अशा ज्वलनशील कचर्याने ही आग धुमसत राहिली. नंतर तीन अग्निशामक वाहनांच्या मदतीने सलग तीन तास पाण्याचा मारा करण्यात आला.
त्यामुळे सायंकाळी काही अंशी आग आटोक्यात आली. या ठिकाणी कचर्याचे मोठमोठे ढिग साचलेले आहेत. पाण्याने वरील बाजू विझली असली तरी चिंबलेल्या ढिगाच्या आतल्या आत आग पसरत राहिल्याने दुसर्या दिवशी सोमवारी ढिगार्यातून धुराचे लोट पसरत राहिले. पसलेला धूर सोनमिया परिसर, हनुमान नगर, नित्यसेवा रुग्णालय, आनंद निवासातील मुली, ग्रामीण रुग्णालय परिसरतील नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरत आहे.
सोमवारी सकाळीच पुन्हा गंगामाई कारखाना व पाथर्डी नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पाथर्डी अग्निशामक दलाचा दिवसभर कचरा ढिगार्यावर पाण्याचा मारा सुरू असताना संपूर्ण आग आटोक्यात आली नाही. रविवारी अग्निशामक वाहनांच्या 18 तर सोमवारी जवळपास 20 पाण्याच्या खेपा होऊनही पूर्णत: आग विझली नाही.
या डंपिंग ग्राऊंडवर वेगळे केलेले प्लॅस्टिक व चिध्यांचे ढिग लिलावाअभावी पडून होते. हा लिलाव होण्यास कोणत्या अडचणी आल्या, हे अनुत्तरित आहे. मात्र, या आगीने नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कचरा डेपोचा विषय खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे ही आग लागली की लावली, या बाबत शहरात जोरदार चर्चा चालू आहे.
पालिकेकडे अग्निशामक वाहनच नाही
शेवगाव नगरपरिषदेने अग्निशामक वाहन खरेदी करावे, अशी दोन वर्षांपासून मागणी आहे. हे वाहन असते तर अग्निशामक दलाची तत्काळ उपलब्धता होऊन कदाचित आगीची घटना काही वेळेतच आटोक्यात आली असती व नगरपरिषदेचे मोठे नुकसान टळले असते, असे बोलले जात आहे.
Tags :
13853
10





