महाराष्ट्र
72995
10
नवरदेव तरुणाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू
By Admin
नवरदेव तरुणाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव :चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरदेव युवकाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी (दि.२) सकाळी ८ वाजल्यापासून हा तरुण बेपत्ता होता. शुक्रवारी ( दि.3) दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान संबंधित तरुणाचा मृतदेह कालव्याच्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील रहिवासी असलेल्या नागेश बंडू गलांडे(वय २५) या तरुणाचा ४ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. गुरुवारी (दि.2) त्याचा सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम असताना, नागेश सकाळी ८ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. त्याचा फोन देखील बंद असल्याने ग्रामस्थांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान त्याची दुचाकी हातगाव – पिंगेवाडीच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या बाजूला लावलेली आढळून आली. मनाची शंका म्हणून गुरुवारी दिवसभर कालव्याच्या पाण्यात त्याचा शोध घेण्यात आला. मित्र – नातेवाईक यांना फोन करून तुमच्याकडे आला आहे का? अशी चौकशी देखील करण्यात आली. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. परंतु नागेशचा ठावठिकाणा लागला नाही.
शुक्रवारी शोधमोहीम सुरू असताना दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात,चारी नंबर ९ च्या गेटजवळ नागेशचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले.शेवगाव पोलिस ठाण्याचे सपोउनि नानासाहेब गर्जे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मृतदेह कालव्यातून काढून उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
पोस्टमार्टम झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ‘नागेश’ यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे हातगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सपोउनि नानासाहेब गर्जे यांनी दिली.
Tags :

