पाथर्डी- कुलूप तोडून पावणेचार लाखांचे दागिने लंपास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे पावणेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथे घडली.
याबाबत दिनकर रंगनाथ कोरडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी पावणेचार लाख रूपये किमतीचे सुमारे तेरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दिनकर कोरडे हे शनिवारी (दि.17) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पाथर्डी येथे लग्न समारंभासाठी आले होते. पत्नी अनिता या त्यांच्या कडगाव गावच्या शिवारात शेतात कापूस वेचण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दिनकर कोरडे घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.
घरातील बेडरुमधील कपाटातील सामान खाली अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाट उघडे होते. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी कपाटातील 36 हजार किमतीचे मिनी गंठण, 63 हजार किमतीचे सोन्याचे गंठण, 39 हजारांचे नेकलेस, 57 हजारांचा राणी हार, 18 हजार किमतीचे टॉप झुबे, 15 हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 1 हजार 500 रूपयांचा जोड, 30 हजारांच्या दोन अंगठ्या, 24 हजारांचे सोन्याचे ओम, 18 हजारांच्या लहान मुलाच्या 12 अंगठ्या, 51 हजारांची सोन्याची मोहनमाळ असा एकूण 3 लाख 79 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी दिवसाढवळ्या घर फोडून दागिने चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत.