महंत नामदेव शास्त्री यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील जागृत ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ महाराज मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण समारंभ श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
गेल्या दोन वर्षात सोनोशी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनतर लगेचच लोकवर्गणीतून श्री ब्रह्मनाथ मंदीराच्या शिखराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लक्ष्मीआईचे मंदीरही नव्याने बांधण्यात आले. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी दिनांक २८ मार्च सोमवारचा मुहुर्त काढण्यात आला होता. त्या निमित्ताने त्रिदिनी किर्तन समारंभाचे नियोजन करण्यात आलेले होते.आदल्या दिवशी श्रीक्षेत्र गहीनीनाथगडचे महंत विठ्ठल महाराजांच्या उपस्थितीत कलश पुजन करण्यात आले. तर कलशारोहण प्रसंगी सोनोशीकरांचे भगवानगडावर विशेष प्रेम असल्याचे सांगून सर्वांनी भगवानगडच्या वारीसाठी येत जाण्याचे आवाहन केले, त्याला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
श्री ब्रह्मनाथ महाराज मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाची सांगता मंगळवार रोजी इंदुवासीनी गडाचे साधू त्रिविक्रमशास्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. ह. भ. प. विशाल खोले महाराज व ह. भ. प. आसाराम बडे महाराज यांची ही किर्तनसेवा सोमवार व मंगळवारी झाली.
कलशारोहण कार्यक्रमाच्या सर्व खर्चाची रक्कम सोनोशीच्या विवाहित व अविवाहित कन्यांनी केली होती. यावेळी या सर्व कन्यांचा सोनोशीतील स्रीयांनी सन्मान केला.
या कार्यक्रमास तारकेश्वरचे आदिनाथ महाराज, येळेश्वरचे रामगिरी महाराज, रामनाथ महाराज, झुंबड महाराज यांच्यासह अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली.
या कार्यक्रमास सोनोशी पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक उपस्थित होते. कोरोना नंतर प्रथमच एकत्र येत हा समारंभ साजरा झाल्यामुळे ग्रामस्थात उत्साहाचे वातावरण होते.