महाराष्ट्र
बसस्थानक बनली घाणीचे आगारे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin
बसस्थानक बनली घाणीचे आगारे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील माळीवाडा, तारकपूर व स्वस्तिक चौक बसस्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यात अहमदनगर शहरातील तीनही बसस्थानकांमधून बस जात आहेत. दिवसभरात तीनही बसस्थानकांमधून हजारो बस ये-जा करतात. सुरवातीला नगर शहरात माळीवाडा हे एकमेव बसस्थानक होते. लोकसंख्या वाढल्याने व बसची संख्या वाढल्याने तारकपूर बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. मात्र, तारकपूर आगारही कमी पडू लागल्याने स्वस्तिक चौकातील बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. या तीन बसस्थानकांच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिल्या जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील तीनही बसस्थानकांत अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. पूर्वी या तीनही बसस्थानकांतील स्वच्छतेसाठी निविदा मागवून काम देण्यात आले होते. मात्र, ते रद्द झाले. आता स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तीन बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी अवघे सहाच कर्मचारी आहेत. त्यांच्यावर सहा बसस्थानकांच्या स्वच्छतेचा भार आहे. यामध्ये तारकपूरमध्ये तीन, माळीवाड्यात दोन व स्वस्तिक चौकातील बसस्थानकात एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त आहे. तीनही बसस्थानकांचा परिसर पाहता, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य कायम राहत असल्याची शक्यता आहे.
बसस्थानकांना अस्वच्छतेचा विळखा...
माळीवाड्यातील तो खड्डा जीवघेणा
माळीवाडा बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. यामध्ये अनेक बस आदळत असून, प्रवाशांना किरकोळ दुखापती होत आहे. एसटी प्रशासनाने या ठिकाणी मुरूम टाकून खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसाने मुरूम वाहून गेला आहे. त्यामुळे हा खड्डा कायमस्वरुपी बुजवून टाकण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृह नेहमीच अस्वच्छ
शहरातील तीन बसस्थानकांमध्ये नेहमीच अस्वच्छता राहत आहे. याबाबत प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या, तरी त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, कारभारात सुधारणा होण्याची मागणी होत आहे.
'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ब्रीदानुसार एसटीचा कारभार सुरू आहे. मात्र, नगरमधील तीन बसस्थानकांमध्ये सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने बसस्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.
- रणजित श्रीगोड,जिल्हाध्यक्ष, प्रवासी संघटना
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बसस्थानकांची स्वच्छता राहण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येणार आहे.
-विजय गिते,विभागनियंत्रक, अहमदनगर
Tags :
316
10