Breaking- बॉम्बच्या भीतीने 'या' ठिकाणी अहमदनगरमध्ये पळापळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहरात सध्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत हे कामकाज आलेले आहे. या ठिकाणी एक बेवारस बॅग आढळून आली. या ठिकाणाजवळच स्वस्तिक बसस्थानकही आहे. त्यामुळे ही बॅग एखाद्या प्रवाशाची आहे किंवा कोणी जाणीवपूर्वक ठेवली आहे, याबाबत उलटसुलट चर्चा परिसरात सुरू झाली.
अहमदनगर शहरातील स्वस्तिक बसस्थानकासमोर असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली ठेवलेल्या एका बॅगेमुळे बुधवारी दुपारी पोलिसांची धावपळ उडाली.
बॉम्बशोधक पथकाने त्यांच्याकडे असणाऱ्या गॅजेटने बॅग बाहेरून तपासली असता, त्यामध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचे सिग्नल मिळत होते. त्यामुळे पथकासह उपस्थितांची धडधड वाढली.
काही जागरूक नागरिकांनी ही माहिती पोलिस प्रशासनाला दिली.पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. बॉम्बशोधक पथकाने बॅगेत बॉम्बसदृश वस्तू आहे का, याचा शोध घेण्यासाठी असणारे गॅजेट लावले, तेव्हा त्याचा लाल दिवा लागला. त्यामुळे धावपळ उडाली. अहमदनगर- पुणे महामार्गावरील वाहतूक आनंदऋषीजी महाराज रुग्णालयापासून वळविण्यात आली. बॅग आढळून आलेल्या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबविली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, अन्य अधिकारी आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.बॉम्बशोधक पथकाने बॅगमध्ये नेमके काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यात धातूचे घड्याळ व काही कपडे आढळले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.