स्व.चंदनमल व कुंदनमल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जलकुंभ उभारणी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील नावलौकिक मिळविलेल्या श्री तिलोक जैन विद्यालयात दोन वर्षापूर्वी जेष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या (सहस्रचंद्रदर्शन ) निमित्ताने संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, ही इच्छा प्रदर्शित करून त्यासाठी जलकुंभ उभारणीकरिता देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी गतवर्षी दिनांक २८ फेब्रुवारी रोजी स्व. देशभक्त चंदनमल गांधी व कुंदनमल गांधी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चंपालाल गांधी व गांधी परिवाराच्या वतीने मोठी देणगी देऊन या कामाची सुरुवात केली होती. त्या नंतर सदरचे काम अतिशय जलद गतीने झाले. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या निमित्ताने या अंतिम टप्प्याचा धनादेश चंपालाल गांधी यांनी प्राचार्य अशोक दौंड यांच्याकडे सुपुर्द केला.
या प्रसंगी कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ . सचिन गांधी , डॉ. अभय भंडारी, सल्लागार मंडळाचे सदस्य विश्वजीत गुगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक दौंड यांनी मानले.