महाराष्ट्र
थोरात यांचं विखे पाटील यांना प्रत्युत्तर, नगरमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्याने द्वंद्व रंगणार?
By Admin
थोरात यांचं विखे पाटील यांना प्रत्युत्तर, नगरमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्याने द्वंद्व रंगणार?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे.
त्या काळात त्यांनी चांगलं काम करावं. त्यात आमच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करायची तर ती देखील करावी," असं प्रत्युत्तर माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी दिलं आहे. मागील सरकारच्या काळातील महसूल विभागात झालेल्या कामांची चौकशी करण्याची गरज असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील कालच (15 ऑगस्ट) म्हणाले होते. अहमदनगर ( Ahmednagar ) इथे आजादी गौरव पदयात्रेसाठी आले असता बाळासाहेबर थोरात यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी थोरात यांनी विखेंना हे उत्तर दिलं.
सुजय विखे पाटील यांनाही खोचक टोला
तसंच खासदार सुजय विखे पाटील यांनाही थोरात यांनी खोचक टोला लगावला आहे. "दोन महसूल मंत्र्यांच्या कामातील फरक दाखवून देऊ," असं सुजय विखे पाटील म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, "त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देऊन महाराष्ट्रात प्रसिद्धी द्यावी असं मला वाटत नाही." "जनतेने माझा कारभार पाहिला, आता त्यांचा कारभार जनता पाहिल," असंही थोरात म्हणाले.
रखडलेल्या खाते वाटपावरुन थोरातांची टीका, विखे-पाटलांचं उत्तर
याआधी खाते वाटप रखडल्याने बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली होती. बिनखात्याचे मंत्री झेंडावंदन करणार असं थोरात म्हणाले होते. थोरात यांच्या या टीकेलाही विखे पाटील प्रत्युत्तर दिलं होतं. "आपल्या जिल्ह्यातील एक वरिष्ठ मंत्री होते, ते आमच्यावर बिनखात्याचे मंत्री झेंडावंदन करणार असल्याची टीका करत होते. मात्र त्यांनी आमची चिंता करु नये. ज्यावेळी खातेवाटप होईल त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचा पहिल्यांदा विचार करा," असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खाते वाटप जाहीर झालं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची महसूल मंत्रीपदी वर्णी लागली.
नगरमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्याने द्वंद्व रंगणार?
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगर जिल्ह्यात पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं. महसूल खात्याची सूत्रे हाती घेताच विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले. मविआ सरकारच्या कार्यकाळात महसूल खातं हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होतं. सरकार बदलल्यानंतर हे खातं थोरात यांची कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळालं. त्यामुळे महसूल खात्यातील पूर्वीच्या निर्णयांच्या चौकशीद्वारे बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. परिणामी नगरच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या थोरात आणि विखे-पाटील यांच्यात नव्याने द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.
Tags :
7049
10