सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू"; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संपुर्ण राज्यात काल दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेले दिसून आले. भाजप आमदार श्वेता महाले आयोजित दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली तर अहमदनगर येथे भाजप आणि राष्ट्रवादी गट आमनसामने आले.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी भाजपला जोरदार इशारा दिला.
दहीहंडी निमित्त राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समर्थकांमार्फत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्सवाची स्वागत कमान उभारण्यात येत असल्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शविला. यातून मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते आमनसामने आलेत. यानंतर मग कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादीचे आमदार तथा साईबाबा संस्थाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी भाषणा दरम्यान विरोधकांवर जोरदार टिका करीत सज्जड दम देखील दिला.
काही लोकांना वाटतंय सरकार बदललंय, त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. सरकार बदलले असले तरी आमदार बदललेला नाही. आमदार मीच आहे. आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू. असं कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी भाजपला म्हटलं आहे. त्यामुळे आज दिवसभर आशुतोष काळे यांच्या वक्तव्यावाची चर्चा रंगली. त्यामुळे याचे पडसाद कोपरगावात देखील बघायला मिळाले.
दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनी आयोजिक केलेल्या कार्यक्रमात दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा जमले होते. डॉल्बीच्या धुंदीत नाचताना जमावाने अचानक एका गोविंदाला मारहाण करण्यास सुरूवात केली. ही मारहाण जवळपास 3 मिनिट चालली होती. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हा वाद शांत करण्यात आला. मात्र या घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला होता. अखेर घाईघाईत दहीहंडी फोडण्यात आली. आणि हा कार्यक्रम संपविण्यात आला.