शेवगाव- शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आणि शेवगाव शहर प्रमुख यांना अटक; कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव नगरपरिषद महिला कर्मचाऱ्यांस शिवीगाळ करून मुकादम यांना मारहाण केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याने शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी काटे व शेवगाव शिवसेना शहर प्रमुख सिद्धार्थ काटे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत नगरपरिषदेचे मुकादम सुरेश जयसिंग चव्हाण (वय ५२, रा. पैठण रोड, शेवगाव) यांनी शेवगाव शिवसेना शहर प्रमुख सिद्धार्थ किसनराव काटे व शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी किसनराव काटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे . शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान शहरात शास्त्रीनगर येथे नगरपरिषदेच्या महिला सफाई कामगार शकुंतला संजय वाघमारे व शोभा नंदकिशोर मोहिते सफाईचे काम करत होत्या. त्यांना सिद्धार्थ काटे याने तुम्ही चांगले काम करत नाही, या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच त्यांचे मुकादम सुरेश जयसिंग चव्हाण व रमेश भागुजी खरात हे तिथे आले असता सिद्धार्थ व शिवाजी काटे यांनी दोघांना मारहाण आणि शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे . पुढील तपास स.पो.नि. रवींद्र बागुल हे करीत आहेत .