शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अन्यथा बैठा सत्याग्रह- अविनाश पालवे
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी व परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे संपूर्ण १०० % पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच अविनाश पालवे यांनी तहसीलदार शाम वाडकर यांच्याकडे केली आहे.
पालवे यांनी निवेदनात म्हटले आहे की , अतिवृष्टी होऊन १५ दिवस झाले असुन, प्रशासनाने अजुन सर्व पंचनामे केलेले नाहीत. काही गावांमध्ये घरांचे नुकसान झालेले आहे. पाऊस सर्वत्र झाल्याने पिकांचे सरसकट नुकसान झालेले आहे. प्रशासन पंचनामे करते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. येत्या ८ दिवसात नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शुक्रवार दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी माणिकदौंडी येथे बैठा सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचे पालवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी देवदत्त केकान आणि गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.