शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकाचे नुकसान पाहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला वेळ नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांचा आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जामखेड : ‘राज्यात अनेक भागात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, कांदा कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. ते पाहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला वेळ नाही. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी वेगवेगळे छापे व धाडीचे नाटक चालू आहे. राज्यकर्ते हे शेतकरी लाचार रहावा, गरीब रहावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात. शेतकरी सक्षम झाला तर त्यांची दुकानदारी बंद होईल,’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने जामखेड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शेट्टी यांच्सासह माजी मंत्री रविकांत तुपकर, जामखेड तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, जिल्हासंघटक अॅड.ऋषिकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, जनार्धन भोंडवे, शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, शहर उपाध्यक्ष नितीन जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. राजू शेट्टी, रविकांत तुपकर व मंगेश आजबे हे बैलगाडीत बसून मिरवणुकीत सहभागी झाले होते. मोठय़ा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, ‘आपल्या बापाचे दुख कमी करण्यासाठी तरूण वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत. याच बळावर मी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांच्या तावडीतून सोडविणार आहे.’