कळसुबाई शिखरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखरावर बुधवारी सातव्या माळेला परिसरातील भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर विराजमान झालेल्या कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवात परिसरातील भाविकांसह इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे स्थानिक गावकर्यांनी बाहेरील भाविकांना प्रवेश नाकारत फक्त परिसरातील भक्त भाविकांनाच प्रवेश दिला. तरी देखील कळसूबाई शिखर गर्दीने फुलून गेले होते. नवरात्र उत्सवात पाचव्या, सातव्या व नवव्या माळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामध्ये भाविकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणिय असते. कळसूबाई शिखरावर सोनकी, सूर्यफुलाच्या पिवळ्या फुलांसोबत हिरवीगार वनराई बहरलेली असते व दुपारच्या उन्हाचा त्रास नको म्हणून भाविक पहाटे लवकरच गड चढण्यास सुरुवात करतात. सुमारे १ हजार ६४६ मीटर उंच असणार्या शिखरावर पोहोचण्यासाठी दरमजल करत तीन-साडेतीन तास लागतात. अरुंद पायवाट अवघड ठिकाणी वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्या रस्त्यावर काही ठिकाणी छोटेछोटे स्थानिक व्यावसायिकांनी उभारलेले स्टॉल अशा उत्साही वातावरणात कळसूबाई मातेचा जयघोष करत शिखरावर पोहोचल्यावर थकवा निघून जातो, आणि सर्वात उंच शिखर सर केल्याचे समाधान मिळते. याकाळात प्रचंड गर्दी होत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वनविभाग व राजूर पोलिस ठाण्यांतर्गत ठिकठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन खैरनार, कर्मचारी प्रवीण थोरात, अशोक गाडे, दिलीप डगळे, फटांगरे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला होता.