महाराष्ट्र
327
10
शिक्षक लोकशाही आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिगंबर ढाकणे तर सचिवपदी सुभाष गव्हाणे यांची निवड
By Admin
पाथर्डी- शिक्षक लोकशाही आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिगंबर ढाकणे तर सचिवपदी सुभाष गव्हाणे यांची निवड
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी येथील वसंतदादा विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीची दिनांक १३ ऑक्टोबर रोजी बैठक झाली. या बैठकीत पाथर्डी तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या बैठकीला तालुक्यातील विविध विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक लोकशाही आघाडीचे मावळते अध्यक्ष व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश मिसाळ, सेक्रेटरी आसिफ पठाण, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष छबुराव फुंदे, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गीताराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या बैठकीत सक्रिय कौन्सिल सभासद व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी सुरेश मिसाळ म्हणाले, शिक्षक लोकशाही आघाडी माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. ही संघटना राज्यव्यापी आहे. टी.डी.एफ संघटनेचे भविष्यात सात आमदार झाले तर आपणास आंदोलने करण्याची गरज भासणार नाही. तसेच टी.डी.एफ संघटनेविषयी सखोल माहिती मिसाळ यांनी दिली.
माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव आप्पासाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले, शिक्षक लोकशाही आघाडी चांगले कार्यकर्ते तयार करण्याचे काम करते. संघटनेचा आवाज बुलंद असला पाहिजे. एकोणीस वर्षानंतर टी.डी.एफ संघटनेची ही पहिल्यांदाच निवड होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. संघटना वाढवायची असेल तर निवडणूक झाली पाहिजे आणि संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणारा, धडाडीचा, वेळप्रसंगी खर्च करण्याची तयारी असणारा कार्यकर्ता निवडा. शेवटी नूतन कार्यकारिणीला अप्पासाहेब शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीत पाथर्डी तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली ती पुढीलप्रमाणे- अध्यक्ष: दिगंबर ढाकणे, उपाध्यक्ष: भाऊसाहेब कोलते, शिवाजी लवांडे, सचिव: सुभाष गव्हाणे, खजिनदार: महावीर कर्नावट, सहसचिव: सुरेश थोरात, सुभाष भागवत तसेच सक्रिय कौन्सिल सभासद- सुरेश मिसाळ, आसिफ पठाण, छबुराव फुंदे, सूर्यभान दहिफळे, सुनिल कटारिया, जनार्धन मरकड, रामदास दहिफळे, अशोकराव सानप, वसंतराव खेडकर, रामनाथ सुरसे, शिवाजी आठरे, गीताराम वाघ, देविदास पालवे, शरद नजन, श्रीकांत शहाणे, भास्कर कासार, लक्ष्मण बोरुडे, भाऊसाहेब कचरे आदींची निवड करण्यात आली.
या बैठकीला जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र गुलदगड, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक बाळासाहेब राजळे, मागासवर्गीय अल्पसंख्यांक ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान आराख, कलाध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष गणेश सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नेहुल, एकलव्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीकांत निऱ्हाळी, पाथर्डी पदवीधर डीएड शिक्षक संघाचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण तसेच तालुक्यातील विविध विद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Tags :

