चिचोंडी येथील आनंदतीर्थात रंगला आनंद भजनसंध्येचा कार्यक्रम
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी (शिराळ) येथील आनंदतीर्थ येथे १९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने आनंद संगीत मंडळाच्यावतीने आनंद भक्ती गीतांची भजनसंध्या संगीत मैफलीचे आयोजन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
यावेळी रंगलेल्या आनंद भक्ती भजनसंध्याच्या संगीत कार्यक्रमात बहारदार भक्तीगीतांचे सादरीकरण झाले.
या मैफलीचा प्रारंभ बिपीन खंडागळे यांनी 'ओम नमो अरिहंताणं' या नवकार मंत्राने केला. कार्यक्रमाचे आयोजक सतिश गुगळे यांनी गायलेल्या 'भक्ती की है रात' या गीतावर रसिकांनी आनंदतीर्थ डोक्यावर घेतले. शाहीर भारत गाडेकर यांनी गायलेल्या 'चिचोंडी गावाचं मंदिर झालं' या भक्तीगीतास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. बिपिन खंडागळे यांनी गायलेले 'प्रभू गुण गा ले' चंदन कुचेरिया यांनी गायलेले 'मेरे सर पर रख दो' तसेच संजय राजगुरू यांनी गायलेले 'केशरी केशरी' ही गाणी रसिकांची वाहवा मिळवून गेली.
शाहीर भारत गाडेकर यांनी 'महावीर आते है' 'गुरु मेरे परमात्मा' 'जीवन नैया' ही गीते बहारदार पहाडी आवाजात साकारली. बिपिन खंडागळे यांची 'चिचोंडीवाले आनंद बाबा' ही कव्वाली तसेच चंदन कुचेरिया यांचे 'बंद किस्मत के ताले पे' या भक्तीगीतांना दाद मिळाली. आयोजक सतिश गुगळे यांच्या 'आनंद माझा.. माझा.. माझा..' या आनंदभक्ती गीतास उपस्थित सर्व श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. या कार्यक्रमात अनेक भक्तिगीतांना वन्स मोअर आले.
या भक्ती संगीत मैफलीची सांगता 'आनंद धुंन' ने करण्यात आली.
राजेंद्र चव्हाण यांनी ढोलक वाजवत तर सचिन साळवे यांनी सिंथेसायझर व अल्थाफभाई शेख यांनी ॲक्टोपॅड वाजवत उत्कृष्ट संगीताची साथ दिली. तसेच सुनिल कटारिया यांनी या कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी व उठावदार सूत्रसंचालन केले.