शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे - प्रा. बबनराव धावणे
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात कोरोनाच्या कठीण प्रसंगात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रेसिडेन्सीअल हायस्कूल मधील सेवानिवृत्त शिक्षक बबनराव धावणे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना चे सर्व नियम पाळून मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना, योग्य करिअर निवडून चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करा, मोबाईलचा अतिवापर टाळून ग्रंथमित्र बना. शिक्षणाने माणूस अष्टपैलू बनतो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असा मूलमंत्र त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाने, सूत्रसंचालन प्रा. सुरेखा चिमटे तर आभार प्रा. प्रणिता भावसार यांनी मानले.
याप्रसंगी प्रा. प्रदीप वारूळकर, प्रा.अश्विनी एडके, प्रा. तबस्सुम पटेल, प्रा. सुनिल कचरे उपस्थित होते.