जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड
नगर- प्रतिनिधी
जिल्ह्यात यंदा रब्बीत आतापर्यंत सुमारे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. अजूनही अनेक भागात कांदा लागवड सुरु आहे. रब्बी आणि उन्हाळी लागवड मिळून दीड लाख हेक्टरच्या जवळपास लागवड क्षेत्र होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. विशेष म्हणजे कांदा दरात सातत्याने चढ-उतार, पावसाने नुकसान आणि बियाण्याच्या गंभीर टंचाईला सामारे जावे लागूनही क्षेत्र वाढत असल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात दरवर्षी साधारण ८० हजार ते एक लाख हेक्टरपर्यंत कांद्याची लागवड होते. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. मात्र सातत्याने पाऊस सुरु राहिल्याने रब्बीतील ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी वेळेत करता आली नाही.
त्यामुळे रब्बीचे क्षेत्र घटले. त्यात कापसाचा हंगाम पूर्ण होण्याआधीच बोंडआळी व पावसाच्या नुकसानीने कापूस काढून टाकावा लागला. त्याचा परिणाम गहू व कांदा लागवडीवर झाला आहे.
यंदा रब्बीत आतापर्यंत १ लाख २० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. त्यात अजूनही कांदा लागवड सुरु आहे. त्यामुळे यंदाचे रब्बीतील व उन्हाळी मिळून दीड लाख हेक्टरच्या जवळपास जाण्याचा अंदाज आहे.
तालुकानिहाय लागवड (हेक्टरी)
नगर - १८, ८३२, पारनेर - २३, २५८, श्रीगोंदा - १७,२९३, कर्जत - ९,९९१, जामखेड - ३,२५०, शेवगाव - ३,०६६, पाथर्डी - ७,१४८, नेवासा - १,७१३, राहुरी - ५,३२१, संगमनेर - ९,४१३, अकोले - ३,३१६, कोपरगाव - ९,१५९, श्रीरामपूर - ५,४५८, राहाता - २,६७८
दुष्काळी भागात क्षेत्र अधिक
दरम्यान, जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यात यंदाची लागवड पाहता अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या पारनेर, नगर, कर्जत, संगमनेर, पाथर्डी तालुक्यात कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.