पाथर्डी- पाण्याच्या दाबाने सहा नालेबांध फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे ३० ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोखाचा व आंबराईचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला तर घाटाजवळील घोरदरा तलाव ९० टक्के भरला असून डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या दाबाने सहा नालाबांध फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
एकाच रात्री तलाव ओव्हरफ्लो झाल्याची किमया ७५ वर्षात पहिल्यांदाच घडली असल्याचे गावचे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक मुखेकर, मुरलीधर अकोलकर, सुधाकर अकोलकर,रामदास अकोलकर यांनी सांगितले. या पावसामुळे करंजी गावचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न रात्रीतून सुटला आहे. गेली अडीच महिने पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु निसर्गाच्या कृपेने ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एकाच रात्रीत दोन तलाव ओव्हरफ्लो झाले तर एक तलाव ८० टक्के भरला त्याचबरोबर डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे खंडोबावाडी एक, परशुरामदरा दोन, चिंचखोरे एक,भावले वस्ती दोन असे सहा नालाबांध फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.