तिसगावचे निस्वार्थी निष्कलंक व्यक्तीमत्व हरपले, तिसगाव शहरावर मोठी शोककळा
By Admin
तिसगावचे निस्वार्थी निष्कलंक व्यक्तिमत्व हरपले,तिसगाव शहरावर मोठी शोककळा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शनिवार 08 मे 2021
रमजानचा महिना त्यातच शुक्रवार दिवस म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये या दिवसाला मोठे महत्व असून जुम्मा असे देखील म्हणतात. या दिवशी म्हणजे दिनांक ७ मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना या आदर्शवत निस्वार्थी निष्कलंक व्यक्तीमत्वाने अखेरचा श्वास घेतला आणि सर्वांनाच आयुष्यभराची हळहळ लावून गेले. तिसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच फिरोजभाई पठाण यांच्या अकस्मात निधनामुळे तिसगाव शहरच नव्हे तर परिसरातील सर्वच गावांमधून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. एक आदर्श तरुण व्यक्तिमत्व, निस्वार्थी निष्कलंक, सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणार, तरुणांची एक मोठी फळी उभी केलेलं, शांत संयमी असे हे युवा उमदे कर्तबगार तरुण व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले आहे.त्यांच्या नावाचा मोठा दरारा होता. समाजासाठी असणारी त्यांची व त्यांच्या कुटुंबाची तळमळ नेहमीच वाखाण्याजोगी होती. उपसरपंच पदावर काम करत असताना निस्वार्थपणे त्यांनी गावातील सर्वसामान्य माणसांची कामे मार्गी लावली अनेक वेळा पदरमोड करून त्यांनी गावात वृक्षारोपण करणे स्वच्छता अभियान राबवणे यासह सामुहिक व वैयक्तिक स्वरुपात देखील विविध प्रभागातील लोकांचे प्रश्न सोडवले. सर्वसामान्य माणसांची सेवा केली. त्यांच्या सुखदुःखात धाऊन गेले. त्यामुळे अल्पावधीतच तिसगावसह परिसरात त्यांचा एक वेगळा ठसा उमटला गेला. मला स्वतःकरता नाहीतर समाजाकरता काहीतरी करायचंय तेही निष्कलंकपणे करायचं. रमजान असो ईद असो गणपती उत्सव शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो या सर्व धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात त्यांना मानणारा मित्रपरिवार फार मोठा होता. अशा या महान सर्वसामान्यांचा मसीहा म्हणून ओळख निर्माण केलेल्या या तरुण व्यक्तीचे आपल्यातून अचानकपणे निघून जाण्यान हा आभाळा एवढा दुःखाचा डोंगर त्यांच्या सर्व हितचिंतक चाहत्यांवर देवाने उभा केला आहे.यातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती द्यावी हीच प्रार्थना.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले त्यावेळेस ते खूप दुःखी झाले होते. आईचा अंत्यविधी नगरला झाला फिरोजभाईना त्यांचा मृत्यू दिसत होता की काय माहित नाही परंतु त्यांनी देखील मला मरण आले तर माझ्या आई जवळच मला जागा मिळावी अशी इच्छा देखील आपल्या घरातील कुटुंबीयांकडे व्यक्त करून दाखवली होती आणि त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आईच्या कबरीजवळच फीरोजभाईनाही जागा देण्यात आली.

