महाराष्ट्र
टेम्पोच्या धडकेत बालकाचा मृत्यू
By Admin
टेम्पोच्या धडकेत बालकाचा मृत्यू
चालक मद्यधुंद अवस्थेत, क्लीनर व चालकाविरोधात गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहिल्यानगर : पुण्याहून नगरकडे भरधाव वेगात
येणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेस धडक दिल्याने महिलेच्या हातातील तीन वर्षाचा मुलगा खाली पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव इंडस्ट्रियल एरिया जवळ घडली.
मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. स्वराज संभाजी महारनवर (वय ३) असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत संभाजी रामदास महारनवर (रा. शिक्षक कॉलनी, मोहिनीनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वाहन चालक शंकर उर्फ शेखर राघू मोरे, क्लीनर चंद्रकांत दत्तात्रय जपकर (दोघे रा. नेप्ती, ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना वाहनासह ताब्यात ही घेतले आहे. हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी संभाजी हे रेल्वे स्टेशनवर हमाली काम करतात तर त्यांची पत्नी कल्याणी महारनवर ही तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलास घेऊन केडगाव इंडस्ट्रियल एरिया येथील कंपनीत कामाला जाते. मंगळवारी (दि. ३) संध्याकाळी काम सुटल्यानंतर ती महिला तिच्या बरोबर असलेल्या मनीषा येळमकर, कविता लोखंडे, योगेश लोखंडे, राणी आंधळे, सुषमा
स्वराज महारनवर
येवले (सर्व रा. केडगाव) यांच्यासह घरी जाण्याकरिता निघाल्या. त्या केडगाव इंडस्ट्रियल एरिया बाहेर आल्या व रस्ता ओलंडण्याकरिता रॉयल एनफिल्ड शोरूमच्या समोरील गेट समोर उभ्या राहिल्या. पुण्याच्या दिशेकडून नगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी टेम्पोने (क्र एम. एच. १२ डब्ल्यू. एक्स. २०५९) कल्याणी महारनवर यांच्या हाताला धडक दिली. त्यामुळे त्यांच्या हातातील त्यांचा तीन वर्षाचा मुलगा स्वराज हा खाली पडून गंभीर जखमी झाला. अपघात होताच तेथील नागरिकांनी स्वराज यास तात्काळ नगरमधील खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर स्वराज यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मुलास मृत घोषित केले- धडक दिलेल्या टेम्पोत दारूच्या बाटल्याही आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी संभाजी महारनवर यांनी दिलेले फिर्यादीवरून टेम्पो चालक शंकर मोरे आणि क्लीनर चंद्रकांत जपकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक शंकर मोरे व क्लीनर चंद्रकांत जपकर यांना टेम्पोसह ताब्यात घेतले आहे.
Tags :
30039
10