भाविकांना लुटणारे दरोडेखोर जेरबंद'; मुख्य सूत्रधार लखन कासार फरार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नाशिक येथील भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या पोलिसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. लुटमार करून पसार झालेल्या पाच आरोपींना आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांसह नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लखन बाबासाहेब कासार फरार आहे.
आरोपींनी नाशिक येथील भाविकांची खासगी बस अडवून त्यांना शस्त्र व पिस्तुलाचा धाक दाखवून पाऊणे नऊ तोळे सोने व रोख १६ हजार ५०० असा ऐवज लुटला होता. हा प्रकार ३१ आॅक्टोबरला घडला होता. या प्रकरणी पवन सुखदेव खैरनार यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांनी समांतर तपास सुरू केला.
कारवाईत शुभम उर्फ मोन्या ऊर्फ सावळा संजय भोसले (वय १९), मयूर संजय भोसले (वय २१), राहुल भगवान भोसले (वय २४, सर्व रा. कासारवाडी, ता. पाथर्डी), नीलेश ईलिया बनकर (वय १९, रा. कंजरी, ता. पाथर्डी), किशोर रामदास वांदेकर (वय २५, रा. मोहोज खुर्द, ता. पाथर्डी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली. ही वाहने मुख्य आरोपी लखन बाबासाहेब कासार याच्या मालकीच्या आहेत. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तसेच उपाधीक्षक नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, निवृत्ती आगरकर, सहायक निरीक्षक हरिष भोये, नितीन दराडे, बाबासाहेब बडे आदींनी ही कामगिरी केली.