महाराष्ट्र
साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर करावी
By Admin
साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर करावी
साखर सहसंचालकांची सूचना; कारखान्यांचा एमएसपीचा सूर
नगर सिटीझन live टिम वृत्तसेवा
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) जाहीर करावा, अशा सूचना प्रादेशिक सहसंचालक साखर संतोष बिडवई यांनी मंगळवारी दिल्या. या वेळी बहुतांशी साखर कारखान्यांनी साखरेची किमान आधारभूत किंमत वाढावी, अन्यथा आर्थिक अनिष्ट तफावत वाढण्याची भीती व्यक्त केली.
बिडवई यांनी मंगळवारी (दि. १०) जिल्ह्यातील साखर कारखाना व्यवस्थापकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी नगरच्या जवळपास सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापक हजर होते. जिल्ह्यात ऊसगळतीचा हंगाम सुरू होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसदराची कोंडी फुटलेली नाही. दरम्यान, केंद्र सरकारने यंदा शेतकऱ्यांच्या उसाला ३४०० रुपये एफआरपी देणे बंधनकारक केले आहे. यात गाळप होणाऱ्या उसाला १०.२५ उतारा मिळाल्यास त्यास ३४०० रुपये एफआरपीनुसार दर साखर कारखान्यांना अदा करावा लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक कारखान्याने एफआरपीनुसार दराची घोषणा करणे आवश्यक आहे. वास्तवात हे दर कारखाना सुरू होताना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, ते झाले नाहीत. यामुळे आता तरी हे दर जाहीर करावेत, असे आदेश बिडवई यांनी बैठकीत दिले. प्रादेशिक उपसंचालक साखर संजय गोंदे, कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे आदी हजर होते.
साखरेला ४ हजारांवर दर मिळावा
सध्या साखरेला भाव नाही. साखरेची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ३४०० रुपये आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली एफआरपी, साखर उत्पादन खर्च, ऊसतोडणी वाहतूक खर्चासह अन्य खर्चाचा हिशेब पाहता कारखान्यांकडील साखरेला ४००० ते ४२०० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास नगरसह राज्यातील साखर कारखान्यांची अनिष्ट तफावत वाढणार आहे. यासाठी सरकारने हस्तक्षेप करत कारखान्यांकडील साखरेला ४ हजारांपेक्षा जास्त दर मिळावा, अशी अपेक्षा बैठकीत साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाकांनी व्यक्त केली.
तोडणी कामगारांना सोयी सुविधा द्या नगर जिल्ह्यात सर्व साखर कारखाना
व्यवस्थापनांनी ऊसतोडणी करणारे कामगार, त्यांच्या कुटुंबांना निवारा व पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करावी. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासोबत आरोग्यासाठी लसीकरण मोहीम राबवावी यासाठी कारखाना अथवा तोड सुरू असणाऱ्या भागातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, तोडणी कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना सहसंचालक बिडवई यांनी कारखान्यांच्या कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
Tags :
20510
10