महाराष्ट्र
साडीने दगड बांधून गोणी विहिरीत टाकली
By Admin
साडीने दगड बांधून गोणी विहिरीत टाकली
वकील दाम्पत्य हत्याकांड खटला
माफीच्या साक्षीदाराची कबुली; उलटतपासणी सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी
मानोरी (ता.
राहुरी) येथील अॅड. राजाराम आढाव व पत्नी अॅड. मनीषा आढाव यांच्या अपहरणानंतर पैशाची मागणी केली. एटीएममधून काही पैसे काढले. पुरेसे पैसे न दिल्याने डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांना साडीने दगड बांधले आणि गोणीत भरून उंबरे येथील स्मशानभूमीजवळच्या विहिरीत टाकून दिले. खून केल्याचा पश्चाताप झाल्यानंतर न्यायालयासमोर कबुली जबाब दिला, असे माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे याने मंगळवारी (दि. १०) न्यायालयात सरतपासात सांगितले. त्याचा सरतपास पूर्ण झाला असून, उलटतपासणी सुरू आहे. त्यासाठी बुधवारी (दि. ११) सुनावणी होणार आहे.
वकील दाम्पत्य हत्याकांड खटला
राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय ३२, रा. उंबरे, ता. राहुरी), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजित महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी), कृष्णा ऊर्फ बबन सुनील मोरे (रा. ता. राहुरी) यांना अटक केली आहे. सोमवारी (दि.९) जिल्हा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाली. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत.
माफीचा साक्षीदार ढोकणे याने मंगळवारीही गुन्ह्याचा पुढील घटनाक्रम न्यायालयात सांगितला. तो असा : आढाव दाम्पत्याला त्यांच्या बंगल्यात बांधून ठेवल्यानंतर पैशाची मागणी केली. त्यानंतर त्यांना मोटारीत बसवून ब्राह्मणी शिवारात नेले. तेथे पुन्हा पैशाची मागणी केली. अॅड. मनीषा आढाव यांच्या खात्यावरून अॅड. राजाराम आढाव यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले. दुशिंग याने एटीएम कार्ड काढून घेतले. पिन विचारून तो मोबाईलमध्ये सेव्ह केला. ब्रेसलेट काढून घेतले. या दोन्ही वस्तू ढोकणे याने न्यायालयात ओळखल्या. आरोपींनी आढाव यांच्याकडे अधिक रकमेसाठी तगादा लावला. ते 'पैसे नाहीत' म्हणाल्यानंतर दशिंगने अॅड. आढाव यांच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घालण्यास सांगितली. त्यानंतर त्यांच्या गळ्याला चिकट टेप लावला. त्यामुळे आढाव बेशुद्ध पडले. त्या वेळी अॅड. मनीषा म्हणाल्या, की तुम्ही वकील साहेबांना मारले आहे. मलाही मारून टाका. त्यानंतर दुशिंगने
...तर बलात्कार करण्याची धमकी
अॅड. आढाव दाम्पत्याला मोटारीत बसवून पुन्हा ब्राह्मणी शिवारातील वन विभागाच्या मोकळ्या जागेत आणले. तिथे दुशिंगने पुन्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. वकिलांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर पैसे दिले नाही तर बलात्कार करण्याची धमकी दुशिंग अॅड. मनीषा यांना दिली, असेही ढोकणे याने सांगितले. दरम्यान, दुशिंगने दिलेल्या दोन हजारांचे काय केले असे वकिलांनी विचारले असता तो म्हणाला, की मला पश्चाताप झाला होता. ते पापाचे पैसे नको म्हणून मी ते जाळून टाकले.
त्यांच्याही डोक्यात पिशवी घालण्यास सांगितले. त्याने त्यांच्या गळ्यात चिकट टेप लावला. त्यांच्या पाठीत बुक्क्या मारल्या. त्यानंतर त्याही गप्प झाल्या. त्यानंतर दुशिंगने आम्हाला दगड गोळा करण्यास सांगून मोटारीतच्या डिक्कीत टाकण्यास सांगितले. रस्त्याला आल्यानंतर शुभमला हॉटेल रॉयल पॅलेसमधून दोन गोण्या आणण्यास सांगितल्या. तोपर्यंत दुशिंग व अन्य साथीदारांनी आढाव दाम्पत्याच्या डोक्यातील पिशव्या काढल्या. त्यांना बेशुद्धावस्थेतच मोटारीत बसविले. मोटारकार उंबरे गावात आली. दुशिंगने बबन मोरेला त्याच्या घरून दोन साड्या आणण्यास सांगितल्या. कार थेट उंबरे गावाच्या स्मशानभूमीकडे नेली. तिथे दोघांना मोटारीतून बाहेर काढले आणि साडीने बांधले. त्यात दगडही बांधले आणि दोन्ही गोणीत भरून विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर दुशिंगने घरी आणून सोडले...
नंतर आढाव यांच्या मोटारीने हॉटेल रॉयल पॅलेस येथे आलो. तिथे दुशिंगची कार होती. वकिलांची मोटार शुभमने घेतली. दोन्ही मोटारी घेऊन राहुरीत आलो. किरणने शुभमला वकिलांची कार न्यायालयात लावण्यास सांगितले. शुभमने कार लावली आणि पळत किरणच्या मोटारीत येऊन बसला. त्याच वेळी तिथे पोलिसांची मोटारही आली होती. किरणने मोटारीचा वेग वाढविला, असेही ढोकणेने सांगितले.
दरम्यान, आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी हर्षल ढोकणेची उलटतपासणी सुरू केली. 'मी न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब वाचला होता. मी २७ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी आठपर्यंत पोलिसांच्या ताब्यात होतो. मला त्यांनी गुन्ह्याबद्दल विचारपूस केली होती. मात्र, चौकशीत काहीही लिहून घेतले नव्हते. मी पोलिसांना सांगितले होते, की मला पश्चाताप झाला आहे. न्यायालयात मी सविस्तर सांगितले नव्हते,' असे ढोकणे याने सांगितले.
आरोपींसाठी काचेचे दालन
आरोपींसमोर साक्ष देण्यास भीती वाटत असल्याचे ढोकणे याने सांगितल्याने आरोपींसाठी एकतर्फी काचेचे दालन करण्यात आले होते. त्यामुळे ढोकणे व अन्य आरोपींची नजरानजर होत नव्हती.
Tags :
76735
10