अमित ठाकरेंनी डॉ. विखे पाटील रुग्णालयात देविदास खेडकर यांची घेतली भेट
पाथर्डी प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कॅन्सर आजाराचे उपचार घेत असलेले मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांची डॉ.विखे पाटील मेमोरियल रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
रुग्णालयात त्यांनी डॉक्टर आणि खेडकर यांच्या कुटुंबाशी बोलले. देविदास खेडकर हे पक्षाशी आजपर्यंत एकनिष्ठ राहीले आहेत. त्यांनी न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली. नगर जिल्हा पक्ष वाढीचे कार्य हाती घेऊन पक्षाचा विस्तार केला. अमित ठाकरे यांनी आवर्जून कार्यक्रमातून वेळ काढत खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन, मनसे पक्ष खेडकर यांच्या सोबत असल्याचे सांगत वेळप्रसंगी मोठ्या हॉस्पिटलसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यानिमित्ताने अमित ठाकरे यांनी एक कुटुंबप्रमुख या नात्याने घेतलेली भेट मोठी दिलासा देणारी आणि कॅन्सर सारख्या आजाराला नव्या धीराने तोंड देत पुन्हा एकदा पक्षासाठी काम करण्याची जिद्द देणारी असल्याची भावना यावेळी देविदास खेडकर यांनी व्यक्त केली.