महाराष्ट्र
नंबर प्लेट बदलण्यासाठी 31 मार्चचे अल्टिमेटम
By Admin
नंबर प्लेट बदलण्यासाठी 31 मार्चचे अल्टिमेटम
परिवहन विभागाने दिली मुदत वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुंबईतील वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी आता महाराष्ट्र परिवहन विभागाने ३१ दिवसांपूर्वीच बुधवारी नवीन नोंदणी प्लेट्ससाठी मानक कार्यप्रणाली जाहीर केली आहे.
एप्रिल २०१९ पूर्वी महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या दोन कोटींहून अधिक वाहनांना पुढील चार महिन्यांत नंबर प्लेट बदलाव्या लागणार आहे, अन्यथा या वाहनचालकांना दंड आकारला जाईल. महाराष्ट्र परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत निश्चित
केली आहे. या कामासाठी आता तीन एजन्सी नेमण्यात आल्याची माहिती आहे. वाहन चोरीला आळा ओळख चिन्हांमध्ये एकसमानता आणण्यासाठी, या नंबर प्लेट्सची फिटिंग अनिवार्य करण्यात आली आहे. या नंबर प्लेट बसविण्याची जबाबदारी उत्पादकांवर होती. दुर्मीळ अॅल्युमिनियम मिश्रधातूपासून बनवलेल्या, नंबर प्लेटमध्ये 'इंडिया' या हॉलोग्रामसह एक रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म, क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम, निळ्या रंगात हालाग्राम, हॉट-स्टॅम्प केलेले अक्षर १०-अंकी लेसर-ब्रेडिंग आदीचा या प्लेटवर समावेश असेल.
वाहन मालकाची जबाबदारी
प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि पोलीस यांना मार्च २०२५ ची अंतिम मुदत संपल्यानंतर मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ चे पालन न केल्यास
कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हा दंड वाहन मालकाला आकारण्यात येणार आहे.
कोट्यवधी वाहने
२००८ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्रात १.६२ कोटी दुचाकी आणि ३३ लाख चारचाकी वाहनांसह सुमारे २.१० कोटी वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यानंतरच्या वाहनांवर आवश्यक सुरक्षा उपाय असलेल्या नंबर प्लेट उत्पादकांनीच लावून दिल्या आहेत. वाहनमालकांना नव्या नंबर प्लेट लावण्यासाठी किमान दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट बुक करावी लागणार आहे.
आर्थिक भुर्दंड
नव्याने उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी (कार, ट्रक, बस आणि इतर वाहनांसह) ७५४ रुपये आकारण्यात येतील. यासाठी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे.
अव्यवहार्य मुदत
मुंबईत ५ ते ७ लाख ऑटो आणि टॅक्सीचे मीटर नव्याने कॅलिब्रेट करण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी परिवहन विभागाला लागतो. संपूर्ण परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आदी या कामासाठी जुंपलेले असतात. मात्र, राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी केवळ तीन- साडेतीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परिवहन विभागाला तीन एजन्सींना हे कंत्राट देऊन दोन कोटी वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याची इतकी घाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Tags :
94131
10