संगीत विशारद परीक्षेमध्ये नटराज संगीत अकादमीच्या आरती घुले चे उल्लेखनीय यश
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील नटराज संगीत अकादमीची विद्यार्थिनी कु. आरती घुले हिने संगीत विशारद गायन परीक्षेमध्ये पाथर्डी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
पाथर्डी तालुक्यातील शेकटे या गावचे शहादेव घुले व गंगुबाई घुले यांची कन्या आरती घुले हीने अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाच्या वतीने जून २०२१ या सत्रात घेण्यात आलेल्या संगीत विशारद गायन परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पाथर्डी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
या विद्यार्थीनीने मे २०२० या सत्रासाठी परीक्षा फॉर्म भरला होता. परंतु कोरोना महामारी मुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रात्यक्षिक परीक्षा झाली. तर जून मध्ये लेखी परीक्षा झाली. त्यानंतर नुकत्याच या परीक्षेचा निकाल गांधर्व मंडळाच्या वेबसाईटवर घोषित करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातून एकूण सात विद्यार्थी या परीक्षेसाठी बसते होते. आरती घुले या विद्यार्थिनीला नटराज संगीत अकादमीचे गुरू संगीत विशारद अंकुश कोठुळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल संगीत अकादमी चे संचालक अय्युब पठाण, ह. भ. प. संजय वारे महाराज, शयनाजबी पठाण, संगीत क्षेत्रातील गुरुजन, संगीत रसिक व अकादमीचे विद्यार्थी यांच्याकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.