पराभूत केले, रस्ता बंद ! निवडून आलेल्यांना स्वतःच्याच घरी जाता येईना,
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चितळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार व त्यांच्या पॅनलप्रमुखांनी गावातील तिन रस्ते बंद केले आहेत. खासगी जमीनीतून केलेल्या रस्त्यावरुन लोकांची वाट बंद केली आहे. तर सर्वेनंबरचा रस्ता करुन देण्यात ही मंडळी विरोध करीत आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या पॅनलप्रमुख व ग्रामस्थांना स्वतःच्या घरी जाता येत नाही.
त्यांचा उस तुटून जाण्यासही अडचण निर्माण झाली आहे. चितळी गावात अशोक ताठे यांनी प्रस्थापित पुढाऱ्यांना विरोध करीत स्वतः पॅनल तयार केला. भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी एकत्रीत येवून पॅनल तयार केला, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
पराभूत झाल्यानंतर जेसीबी मशीन लावुन सुरु असलेले शेताकडे व वस्त्यांकडे जाणारे काही गावपुढाऱ्यांनी रस्ते बंद केले. आमची खासगी जागा आसल्याने रस्ता द्यायचा की नाही, असा आमचा प्रश्न आहे. तुम्ही मते दिले नाहीत, ज्यांना मते दिले त्यांच्याकडुन रस्ता घ्या, अशी भूमिका संबंधितांनी घेतली. असे प्रकार आता महाराष्ट्रात होऊ लागले आहेत.
आम्ही आंदोलन करू
गावातील खाराऔढा (नदीकाठचा), वाबळेवस्ती ते जगदंबादेवी मंदिर रस्ता, वडुलेरस्ता ते सर्वे 134 हे तिन रस्ते होणे गरजेचे आहे. रस्ते पराभूत उमेदवार व त्यांच्या नेत्यांनी बंद केले आहेत. सरकारी व पुर्वीचा असलेला रस्ता तयार करुन मिळावा. नदीतील पाण्यामुळे नागरीकांना जाता-येता येत नाही. जनावरे उपाशी राहत आहेत. उसतोड करता येत नाही. ज्यांनी आज वेठीला धरलय, त्यांना लोकांनी आतापर्यंत मते दिलेली आहेत. मला स्वतःला माझ्या वस्तीवर जाता येत नाही. उसतोड करता येईना. रस्ते खुले करुन मिळावेत म्ह्णून तहसिलदार व आमदार मोनिका राजळे यांना भेटुन विनंती केली आहे. रस्ते खुले केले नाहीत, तर अंदोलन करु.