राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'या' आमदाराच्या विरोधातील तक्रार न्यायालयात नामंजूर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर : शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरूद्ध नगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेली एक तक्रार न्यायालयाने नामंजूर केली आहे. आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत संदीप भांबरकर यांनी न्यायालयात ही खासगी फिर्याद दाखल केली होती. हे प्रकरण या न्यायालयात चालविण्यायोग्य आढळून येत नाही. आवश्यकता वाटल्यास तक्रारदार यासंबंधी निवडणूक याचिका दाखल करू शकतो, असे सांगत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. पाटील यांनी ही तक्रार नामंजूर केली आहे.
भांबरकर यांनी 18 सप्टेंबरला ही तक्रार दाखल केली होती. 23 सप्टेंबरला प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीत म्हटले होते की, आ. जगताप यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूकदरम्यान जाहीरनाम्यात त्यांनी नगरमधील आयटी पार्क सुरू केल्याचे म्हटले होते. या आयटी पार्कमध्ये अनेक युवक-युवतींना नोकरी मिळाल्याचा दावाही केला होता. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाने आयटी पार्कला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याचे आपल्याला कळविले. याच अर्थ आ. जगताप यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचे दिसून येते, असा आरोप भांबरकर यांनी केला होता.