महाराष्ट्र
कत्तलखाने जमीनदोस्त करुन पोलीस निरीक्षकांचे निलंबन करा! ठिय्या आंदोलन; या तालुक्यात बंद’ची हाक
By Admin
कत्तलखाने जमीनदोस्त करुन पोलीस निरीक्षकांचे निलंबन करा! ठिय्या आंदोलन; या तालुक्यात बंद’ची हाक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेरातील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करावेत, कत्तलीच्या गुन्ह्यात वारंवार आढळणार्या गुन्हेगारांना हद्दपार करावे, दोषी असलेल्या अधिकार्यांची चौकशी करुन त्यांना सहआरोपी करावे व संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या विद्यमान पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करुन त्यांची बदली करावी या प्रमुख मागण्यांसह संगमनेरातील गोप्रेमी नागरिकांनी आज मोर्चाने जावून प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. यावेळी झालेल्या सभेत विविध कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वाधिक गोहत्या संगमनेरात होत असल्याकडे लक्ष्य वेधीत रोष व्यक्त केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तत्काळ कत्तलखाने जमीनदोस्त झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा एल्गार पुकारल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. प्रशासन आंदोलकांचे समाधान करण्यात अपयशी ठरल्याने मंगळवारी संगमनेर बंदची हाक देण्यात आली असून सदरचे प्रकरण चिघळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या शनिवारी (ता.2) अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीच संगमनेरातील कत्तलखान्यांवर श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने छापा घातला होता. यावेळी शहरातील जमजम कॉलनी परिसरातील पाच साखळी कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल झाल्याचे व अनेक गोवंश जनावरे मृत्यूच्या वेदीवर उभी असल्याचे भयानक दृष्य समोर आले. या कारवाईत पोलिसांनी 31 हजार किलो गोवंशाचे मांस व 71 जिवंत जनावरे हस्तगत केली. या कारवाईनंतर कत्तल झालेल्या गोवंशाची छायाचित्रे सामाजिक माध्यमात व्हायरल झाल्याने तालुक्यासह राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी गोप्रेमी नागरिकांची बैठक होवून संगमनेरचे नाव राज्यात बदनाम करणार्या या घटना थांबविण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याचा प्रत्यय आज झालेल्या आंदोलनातून दिसून आला.
आज (ता.4) सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून गोप्रेमी नागरिकांनी मोर्चाने जात प्रांताधिकार्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. यावेळी विविध हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांसह गोप्रेमी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण दुमदुमून गेले होते. प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून निवेदन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यास नकार देत जो पर्यंत कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले जात नाहीत व संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या विद्यमान पोलीस निरीक्षकांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत निवेदन देणार नाही आणि आंदोलनाची सांगताही करणार नसल्याचा इशारा दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आज सकाळपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देवून बसलेल्या आंदोलकांची समजूत घालण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आदींनी वारंवार त्यांची भेट घेतली, मात्र आंदोलकांचे समाधान करण्यात ते सगळेच अपयशी ठरल्याने आता मंगळवारी संगमनेर बंदची हाक देण्यात आली असून सदरचे प्रकरण चिघळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
संगमनेरातील गोप्रेमी नागरिकांनी तयार केलेल्या निवेदनात गेल्या तीन वर्षात झालेल्या असंख्य कारवायांमध्ये आढळलेले आरोपी तेच ते असतांनाही त्यांच्या तडीपारीचे आदेश का काढण्यात आले नाहीत असा सवाल करुन या सर्व आरोपींना तत्काळ हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. कत्तलखान्यांवरील पोलिसांची कारवाई केवळ फार्स म्हणून केली जाते. प्रत्यक्षात सदर गुन्ह्यांच्या तपासात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा ठेवून आरोपींना मदत करण्याचेच धोरण असल्याचे स्पष्टपणे दिसते. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या कत्तलखान्यांवरील गुन्ह्यांची अधीक्षक स्तरावरील अधिकार्यामार्फत सखोल चौकशी करुन गुन्हेगारांना पोषक असलेले दुवे ठेवणार्या तपासी अधिकार्यांना त्या त्या प्रकरणात सहआरोपी करावे.
मागील वर्षभरात ज्या ठिकाणी कत्तलखान्यांवर छापे पडले अशी सर्व ठिकाणे अवैध आहेत. अशी ठिकाणी मुळासकट जमीनदोस्त करण्याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेच्या मुख्याधिकार्यांची आहे. त्यांनी 48 तासांच्या आंत सदरील सर्व बेकासदा कत्तलखाने उध्वस्त करावेत. पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या नाकाखाली हे सर्व प्रकार घडत असल्याने या उद्योगांना त्यांचेच पाठबळ असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे या दोन्ही अधिकार्यांची खात्यातंर्गत चौकशी व्हावी व त्यांचे निलंबन करण्यात यावे, चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करावे.
मागील दहा वर्षात शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावून गेलेल्या अधिकार्यांच्या काळात झालेल्या कारवायांमध्ये वैद्यक तपासणीसाठी कापलेल्या मांसाचे तुकड्यांचे नमुने न घेणार्या व तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणार्या व गुन्हेगारांना सहीसलामत सुटण्यासाठी मदत करणार्या अधिकार्यांच्या मालमत्तांची चौकशी होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, जो पर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत सुरु असलेले आंदोलन कायम ठेवून मंगळवारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरचे कत्तलखाने उध्वस्त करण्याचा अधिकार पालिकेला असून मुख्याधिकारी राहुल वाघ आज रजेवर असल्याने याबाबत निर्णय होवू शकलेला नाही.
Tags :
8133
10