आधार कार्ड मतदान ओळखपत्रांशी लिंक होणार,१ ऑगस्ट २०२२ पासून विशेष मोहीम
पाथर्डी- प्रतिनिधी
मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी मतदारांच्या मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. १ ऑगस्ट २०२२ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पाथर्डी तालुक्याचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्याम वाडकर यांनी दिली.
एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंद ओळखण्यासाठी आधार कार्ड संकलन केले जात आहे. १ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा तत्पूर्वीच मतदार यादी सुधारणा कार्यक्रम आयोगाने हाती घेतला आहे. यामुळे एकापेक्षा जास्त मतदार संघात असलेल्या मतदार नोंदणीला आळा बसणार आहे. त्यासाठी बी. एल. ओ. च्या नियुक्त्या करण्यात आल्या असून तालुक्यातील मतदारांनी आधार क्रमांकाच्या जोडणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी देवदत्त केकाण, नायब तहसीलदार संजय माळी, महसूल सहाय्यक शिवकन्या नाटकर, ऑपरेटर आकाश माने यांनी केले आहे.
तहसीलदार श्याम वाडकर म्हणाले की, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम २३ नुसार दुरुस्तीन्वये मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांकडून ओळख प्रस्थापित करणे व मतदार यादीतील प्रमाणीकरण करणे हा आहे. मतदारांनी आपल्या गावातील बी.एल.ओ.कडे आधार कार्डची झेरॉक्स प्रत व आधार नोंदणीसाठी फार्म ६ ब भरून द्यावा. फार्म ६ ब बी. एल. ओ.कडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे तहसीलदार श्याम वाडकर यांनी सांगितले.