महाराष्ट्र
रुग्णालयाला आतून कुलुप; डॉक्टर, आरोग्यसेविका वेळेत न आल्याने गेटवरच महिलेची प्रसुती
By Admin
रुग्णालयाला आतून कुलुप; डॉक्टर, आरोग्यसेविका वेळेत न आल्याने गेटवरच महिलेची प्रसुती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगरच्या (Ahmednagar) काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Centre) गेटवरच महिलेची प्रसुती (Delivery) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत रुग्णालयाचे गेट न उघडल्याने गेटवरच महिलेची प्रसुती झाली. आरोग्यसेविका किंवा डॉक्टर वेळेत न आल्याने महिलेवर ही परिस्थिती ओढवली. रात्री एकही डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नव्हते. तर रुग्णालयात केवळ एक वॉचमन उपस्थित होता. रुग्णालयाला आतून कुलूप लावलेलं असल्याने बराच वेळ ही महिला आरोग्य केंद्राच्या बाहेरच वेदना सहन करत थांबलेली होती. अखेर तिची गेटवरच प्रसुती झाली. सुदैवाने महिला आणि तिचे बाळ सुखरुप आहे. मात्र असं असलं तरी घडलेल्या प्रकाराबाबत आणि आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना रुग्णालयाच्या ठिकाणी राहणे बंधणकारक असताना ते बाहेरगावी का राहतात? रात्री ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी होती ते रुग्णालयात का नव्हते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत अनोखं आंदोलन केलं. संदेश कार्ले आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात आले आणि 'प्राथमिक आरोग्य केंद्र विकणे आहे' असा फलक लावला.
आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरा : संदेश कार्ले, माजी जिल्हा परिष सदस्य
आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नसल्याने अशा घटना वारंवार घडत असतात. तसेच शासनाने लवकरात लवकर पदभरती करावे अशी मागणी संदेश कार्ले यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ 986 ANM च्या पदापैकी 585 पद रिक्त आहे. 586 आरोग्य सेवकांची पदं मंजूर असून त्यापैकी 334 पद रिक्त असल्याचे संदेश कार्ले यांनी सांगितलं.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी रुग्णालयाला भेट देऊन संबंधित प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं
Tags :
10024
10