तरूणाला शेवगाव तालुक्यातून बेड्या; टिकटॉकद्वारे ओळख झालेल्या तरुणीचे फोटो केले व्हायरल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
टिकटॉकद्वारे ओळख झालेल्या तरुणीसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतरही तिने लग्नास नकार दिला. त्याच रागातून तिचे फोटो कुटुंबीयांना पाठवून सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देणाऱ्याला चंदननगर पोलिसांनी नगरमधील शेवगाव तालुक्यातून अटक केली.
अब्दुल वहिद शेख (वय 20, रा.माळीवाडा, पाचपीर चावडी,नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादी तरुणी फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत असतानाच तिची टिकटॉकच्या माध्यमातून अब्दुलसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाल्याने अब्दुलने तिला लग्नाची मागणी घातली.
मात्र, तिच्या कुटुंबीयांनी लग्न करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे तरुणीने लग्न करण्यास नकार दिला. रागातून शेखने व्हॉटसअपद्वारे मैत्रिणीच्या चुलत्याला तरुणीचे खासगी फोटो पाठविले. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी दिली.
त्यानुसार चंदननगर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांच्या पथकाने त्याला शेवगाव येथून अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव,पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, अविनाश संकपाळ, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, अतुल जाधव, राहुल इंगळे, अमित कांबळे, गणेश हांडगर, विक्रांत सासवडकर यांनी केली.