महाराष्ट्र
पाथर्डी- श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे रहाड याञा उत्सव
By Admin
पाथर्डी- श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे रहाड याञा उत्सव
विस्तवावरुन चालताच होते नवसपूर्ती; गाव ३५९ वर्षाची परंपरा
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे बुधवारी (दि.27) रोजी रहाड याञा महोत्सव आहे.
हे राज्यात प्रसिध्द असलेले मंदिर त्याच काळातील आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे समर्थ रामदासांनी 'गोमनिय' हनुमंताची स्थापना ३५९ वर्षांपूर्वी केली.अत्यंत जागृत देवस्थान म्हणून अनेकांना या मंदिरात त्याची प्रचिती आलेली आहे.
समर्थ रामदासांनी संपूर्ण महाराष्ट्रात ११ ठिकाणी मारुतीची स्थापना केल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र समर्थांच्या भारतभ्रमण यात्रेत त्यांनी अकरा मारुतीसह अकराशे मारुतीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.आजही ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थान आहेत.
इतिहास संशोधकांच्या मते हे स्थान हर्षवर्धन राजाच्या बखरीत एक महान यज्ञाची पावन भूमी असल्याची नोंद सापडते.या परिसरात उत्तर वहिनी नद्यांचा संगम आहे. नगर शहरापासून हे ठिकाण ५२ कि. मी. अंतरावर आहे.तिसगाव- शेवगाव रस्त्यावर हनुमान टाकळी फाटा आहे.तर वृध्देश्वर करखान्यापासून ५ कि. मी. अंतरावर हे जागृत देवस्थान वसले आहे.
हनुमंताची गोमनिय म्हणजे गाईच्या शेणापासून समर्थांनी ही मूर्ती घडवली.आजही ती मूर्ती अस्तित्वात असून ती हनुमंताच्या इतर मुर्त्यांसारखीच दिसते.मात्र शिळेतून घडविलेल्या मूर्तीसारखे काठिण्य या मूर्तीत नाही.तरीही केवळ शेंदूर लेपणाने ही मूर्ती चिरकाल टिकुन आहे. त्याला वरदहस्त मारुती असे नाव असून मूर्तीचे डोळे सोन्याचे आहे.
या मंदिराला पावणेचरशे वर्षांचा इतिहास आहे. अगदी अलिकडच्या काळात सद्गुरू बाबा महाराज आर्वीकर यांनी त्यांचे शिष्य माधव स्वामी यांना समर्थांनी स्थापन केलेल्या नगर जिल्ह्यातील मारुतीचा शोध घेण्यास सांगितला. गुरुआज्ञेनुसार माधव स्वामी यांनी नगर जिल्ह्यात १९६८ साली या मारुतीची माहिती मिळवली. तेथेच त्यांनी वास्तव्य केले.
याच काळात या परिसरात धरण बांधण्याची योजना शासनाने निश्चित केली. आजूबाजूचा सारा परिसर शासनाने आधीग्रहित केला मात्र हे मंदिर वाचविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यात या मंदिराचे असलेले पुराणकालीन महत्व विशद करण्यात आले. त्याच काळात शासनही कर्मधर्म संगोयाने आपली भूमिका मांडण्यात अयशस्वी ठरले. धरणाचा वाढलेला खर्च त्यापासून होणार लाभ याचा ताळमेळ बसत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे गावकऱ्यांना या जागृत देवस्थान ची महती कळली. त्यांनी शासनाकडून नुकसान भरपाई पोटी स्वीकारलेली रक्कम परत केली. याच मंदिरात माधव स्वामी यांनी ३० वर्षे अनुष्ठान केले. पूर्वी हे मंदिर भव्य वाड्यासारखे असलेले मंदिराचे स्वरुप ज्याच्या भिंती मातीच्या, लाकडी खानाचे मध्यभागी प्रशस्त चौक असलेले मंदिर नव्या रुपात बांधण्याचा गावकऱ्यांनी चंग बांधला. २००९ साली या मंदिराच्या जिर्णोद्धारस सुरुवात केली.आता या भव्य मंदिराचा कायापालट होण्यास अजून एक वर्ष लागणार आहे.
नवीन मंदिराचे काम सुरू असून राजस्थानातील बन्सी पहाड हा तांबूस रंगाचा दगड भरतपूर जिल्ह्यातुन बयाणा- पहाडपूर या गावातुन कुशल कारागिरांच्या हस्ते कोरीव काम करून आणला जातो. या मंदिराची लांबी १४५फूट असून रुंदी ८७ फूट आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ९ ते १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असुन हा सर्व खर्च लोक वर्गणीतून केला जातो. मूळ मूर्तीला धक्का न लावता या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. या देवस्थानात हनुमान जयंती, रामदास स्वामी नवमी, दत्तजयंती, श्रीकृष्णाजन्माष्टमी आदी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
आषाढ वैद्य चतुर्थीला या देवस्थानात रहाड यात्रा भरते. त्यावेळी १२ फूट लांबीचा २ फूट रुंद व ६ फूट खोलीचा खड्डा खणला जातो त्यात बोरीच्या लाकडाचा विस्तव चेतविला जातो. नवस बोललेले अनेक भाविक या विस्तवावर लिलया चालून आपला नवस फेडतात .वास्तविक पाहता या निखाऱ्याजवळ उभा राहीले तरी प्रचंड धग लागते मात्र भाविक सहीसलामत असतात . भाविक विस्तवावरून चालताना मंदिरातील मूर्तीला घाम येतो हे या रहाड यात्रेचे वैशिष्ट्य आहे. आजही यात्रेचे वेळी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी लोटते. सध्या या देवस्थानचे अध्यक्ष रमेश अप्पा भट महाराज आहेत.
Tags :
610
10