महाराष्ट्र
आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ- प्राचार्य यशवंत पाटणे
By Admin
आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ- प्राचार्य यशवंत पाटणे
पाथर्डी - प्रतिनिधी
आई हे सेवेचे,समर्पणाचे आणि वासल्याचे प्रतीक असते, आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ असून कर्तबगार लेकरे हेच आईचे खरे वैभव असते.लक्ष्मीबाई कानडे या मांगल्याचा मंत्र जपणाऱ्या आदर्श माता होत्या.त्यांच्या संस्कारातून घरदार समृद्ध झाले.आईचे मातृत्व हे मुलाबाळाच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असते,असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.
पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील प्रा. अशोक कानडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई कडूभाऊ कानडे यांच्या स्मृतीनिमित्त नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे,जिल्हा कॉंग्रेसचे सचिव अंकुशराव कानडे,औरंगाबाद मनपाचे कनिष्ठ अभियंता शेषराव पवार,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी बन्शी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले की,सध्या अतिरेकी चंगळवादाने जीवनसौंदर्यची आणि संस्कृतीची हानी होत आहे.आर्थिक संपत्तीने घरे दारे संपन्न होतील, पण मने जर असंस्कृत राहिले तर माणसातून पशु निर्माण होतील. यासाठी कुटुंबातून सात्विक संस्कार होण्याची गरज आहे.सौंदर्यप्रसाधनांनी चेहरा सुंदर करण्याच्या नादात मुलांचे आयुष्य संस्काराने सुंदर करणारी आई हरवत चालली आहे. आई या शब्दाला भावनिक आणि सांस्कृतिक पदर आहे.मराठी माणूस संतांना, गुरूंना माऊली म्हणतो.माऊली या शब्दात माया ऊर्जा आणि लिनता याचा संगम आहे.समाज आणि संस्कृती यांच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने आपल्यातील आईपण जगविले पाहिजे. जेऊर हैबती सारख्या ग्रामीण भागामध्ये राहून आपली मुलं सुसंस्कृत करून समाजामध्ये एक इतिहास निर्माण केला. मानवता हा धर्म मानून त्यांनी जीवनात आदर्श निर्माण केला.कुटुंबातील अनेक सदस्यांना उच्चशिक्षित बनवले. त्यामुळेच लक्ष्मीबाई कानडे या परिसरातील सर्वांच्याच माता झाल्या होत्या.त्यांचा आदर्श आजच्या तरुणपिढीने घ्यायला पाहिजे.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,ज्ञानेश्वर कारखाना संचालक प्रा.डॉ.नारायण म्हस्के,चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर,नेवासा प.स.चे उपसभापती किशोर जोजार, इंजि.रमेश घुमरे,गोरक्षनाथ कानडे,संजय कानडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक येरवडा जेल चे तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे यांनी केले तर प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.
Tags :
7835
10