विद्यार्थिनीची छेडछाड; रोडरोमिओ ताब्यात;शेवगाव तालुक्यातील दोघे जण
By Admin
विद्यार्थिनीची छेडछाड; रोडरोमिओ ताब्यात;शेवगाव तालुक्यातील दोघे जण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पंधरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा हात धरून ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. 'तू आमच्या सोबत आली नाहीतर तुला उचलून नेऊ.
ठार मारू,' अशी धमकी देणार्या दोन रोडरोमिओंना पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. त्यांच्यावर पोक्सोे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. प्रताप दराडे यांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलला आहे. अनेक रोडरोमिओंना गजाआड केले. त्यामुळे रोडरोमिओंचा त्रास आहे, त्या मुली आता हिंमत करून समोर येत आहेत. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात 15 वर्षीय शाळकरी मुलीची दोन तरूण वारंवार छेडछाड करीत होते. काही महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शाळेत जात असताना प्रमोद गोरडे तिला म्हणाला, 'तू मला खूप आवडते. मला तुझ्याशी बोलायचे आहे.
तू जर माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करील', अशी धमकी दिली होती. यानंतर हा वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग करुन तिला शाळेसमोर एकटी बघून छेड काढायचा. (दि.6) सप्टेंबर रोजी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ घरी असताना प्रमोद गोरडे याने तिचा हात पकडून ओढले. तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तो म्हणाला, 'मी तुला घेऊन जाण्यास आलो आहे. तू माझ्यासोबत चल, नाहीतर मी आताच जीव देईन,' अशी धमकी दिली. यावेळी दुसरा मित्र अनिकेत जाधव याने मुलीला शिवीगाळ केली. 'तू आमच्यासोबत न आल्यास तुला उचलून घेऊन जाऊ. मारुन टाकू,' अशी धमकी दिली.
दरम्यान, मुलीने रोडरोमिओंच्या भितीने तब्बल 20 दिवसांपासून शाळेत जाणे बंद केले. मात्र, पो. नि. दराडे यांच्या कामाची पद्धत पाहून पीडित मुलीने त्यांच्या व्हॉटस्अॅप नंबरवर मेसेज करून घडलेली घटना सांगितली. दराडे यांनी त्वरित त्या मुलीची फिर्याद दाखल करून, दोन्ही रोडरोमिओंना गजाआड केले. मुलीच्या फिर्यादीवरून प्रमोद दीपक गोरडे (मूळ रा. धनगर गल्ली, ता. शेवगाव हल्ली रा. टाकळीमियॉ ता. राहुरी) व अनिकेत भाऊसाहेब जाधव (रा. टाकळीमियॉ, ता. राहुरी) या दोघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.