पाथर्डी- नागतळा एसटी बस सुरू, अविनाश पालवेंच्या मागणीला यश
पाथर्डी- प्रतिनिधी
शाळा सुरू झाल्याने पाथर्डी मध्ये शिकणाऱ्या शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, चेकेवाडी, माणिकदौंडी, कोकिसपीर, वंजारवाडी,पिरेवाडी, जाटदेवळे व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पाथर्डी - नागतळा एस टी बस सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांनी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांच्याकडे केली होती.
सदर भागातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत आगार प्रमुख महेश कासार यांच्याशी चर्चा करून तात्काळ नागतळा बस सुरू करण्याची मागणी पालवे यांनी केली होती. आगार प्रमुख महेश कासार यांनी 'कोरोना काळामध्ये अनेक बस खराब झाल्या असून उर्वरित गाड्या लांब पल्ल्यासाठी पाठवाव्या लागतात, या कारणाने आपल्याकडे गाड्या शिल्लक नाहीत, तरी आपल्या मागणीनुसार नागतळा बस सुरू करू' असे आश्वासन पालवे यांना दिले होते. त्यानुसार पाथर्डी नागतळा बसचे माणिकदौंडी येथे चालक शिवाजी आव्हाड व वाहक संजय सोनवणे यांचा सत्कार करून सरपंच अविनाश पालवे व नागरिकांनी स्वागत केले व आगार प्रमुख महेश कासार यांचे आभार मानले.
यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अशोकराव आंधळे, अमोल गिते, माणिकदौंडी सरपंच शायद पठाण, पोलीस पाटील वसंत वाघमारे, बिलाल पटेल, ग्रा.पं. सदस्य अर्जुन पाखरे, सुभाष पाखरे, राजु मोरे, भैया पटेल, बबनराव शेळके, हबीबभाई पठाण आदी उपस्थित होते.