सुभाषराव भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेश अध्यक्ष सुभाषराव भागवत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खरवंडी केंद्रातील जवळवाडी येथील जालिंदर माध्यमिक विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी वामनभाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सेक्रेटरी तथा मुख्याध्यापक म्हणाले, आपण जीवनात काहीतरी सत्कार्य केले पाहिजे. सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यही हाती घेतले पाहिजे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित तर होतोच, पण सुसंस्कारितही होतो, त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे.
याप्रसंगी अनिस शेख, मच्छिंद्र आठरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिस शेख, राजेंद्र खेडकर, सतीश भोसले, मच्छिंद्र आठरे, केशव ढाकणे, पांडुरंग शिरसाठ आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.