अहमदनगर बाजार समितीच्या गेटला पुन्हा कुलूप, शिवसेनेचे ते आंदोलन ठरले औटघटकेचे
By Admin
अहमदनगर बाजार समितीच्या गेटला पुन्हा कुलूप, शिवसेनेचे ते आंदोलन ठरले औटघटकेचे
अहमदनगर- प्रतिनिधी
कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एक गेट १० ऑक्टोबर २०१८ पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते. पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे. शिवसेनेचे गेट उघडण्याचे आंदोलन औट घटकेचेच ठरले आहे.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला दोन गेट आहेत.
त्यातील एका गेटचा उपयोग हा बाजार समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो. तर दुसऱ्या गेटचा उपयोग बाजार समितीमधून बाहेर पडण्यासाठी केला जातो. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. पण गेल्या १० ऑक्टोबर २०१८ ला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीस अडथळा कारण दाखवत बाजार समितीच्या बाहेर पडण्याचा गेटला कुलूप लावलेले आहे. परिणाम बाजार समितीत येण्यासाठी आणि बाजार समितीतून बाहेर जाण्यासाठी सर्व वाहतुकदारांना एकाच मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्या चौकात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक कोंडीच जास्त होताना दिसत आहे. या बाजार समितीचे दोन्ही गेट खुले असावेत यासाठी बाजार समितीने ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही गेट खुले करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. पण प्रशासनाने त्यास दाद दिली नाही. मागील महिन्यात शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि इतर शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने त्या गेटचे कुलूप तोडत ते गेट खुले गेले. पण त्यानंतर आठवडाभरातच वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात
आलेले आहे. शिवसेनेचे गेट खुले करण्याचे आंदोलन औटघटकेचे ठरले आहे. बाजार समितीच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने त्या चौकात पुन्हा वाहतूक कोंडी सुरू झाली आहे.
बाजार समितीमध्ये ये-जा करण्याऱ्या गाड्या आणि शेतकरी यांची संख्या मोठी आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने गेटला कुलूप लावल्याने एकाच गेट वर ताण येऊन चौकात वाहतूक कोंडी वाढत आहे. गेट खुले व्हावे यासाठी जिल्हाधिकारी आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. गेट खुले व्हावे हीच बाजार समिती प्रशासनाची इच्छा आहे, असे बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी सांगितले.