सासूच्या मृत्यूनंतर अवघ्या काही वेळात सुनेचाही मृत्यू ; एकाच वेळी दोघीवर अत्यंविधी
गाव हळहळलं
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सासू-सूनेचं नात म्हटलं की आपण बऱ्याद भांडणं, वाद विवाद याच गोष्टी ऐकत असतो. समाजामध्ये सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो.
मात्र काही नाती ही खूप जवळची असतात. त्यातलंच सासू-सूनेचंही नातं. अनेक उदाहरणंही अशी पाहायला मिळतात. असंच एक उदाहरण अहमदनगरच्या राहुरीमधून समोर आलं आहे. सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेचा देखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मालनबाई पांडुरंग शेजुळ असं सासूचे तर मीराबाई भाऊसाहेब शेजुळ सुनेचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील आझाद चौकात शेजुळ कुटुंब राहतं. या कुटुंबातील मालनबाई शेजुळ (सासू) यांना 7 जुलैच्या पहाटेच्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी शहारातीलच रुग्णालयात भरती केलं. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मालनबाई यांचा मृत्यू झाला. मालनबाई यांच्या मृत्यूनंतर शेजुळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
ही बातमी घरी कुटुंबियापर्यंत पोहोचली. सासूच्या मृत्यूची बातमी समजल्यावर मीराबाई शेजुळ यांना त्रास होऊ लागला. तात्काळ त्यांना देखील त्याच रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात सासू आणि सूनेचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर सासू सूनेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आली. सासू सुनेचे हे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली आहे. सासूच्या निधनाचं दु:ख सहन न झाल्यानं सूनेचाही मृत्यू झाल्याच्या या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.