महाराष्ट्र
34426
10
तप,आत्मसाधना व उत्तम चारित्रद्वारे जीवन समृद्ध करावे- प.पू. प्रथमदर्शनाजी महाराज
By Admin
तप,आत्मसाधना व उत्तम चारित्रद्वारे जीवन समृद्ध करावे- प.पू. प्रथमदर्शनाजी महाराज
आनंदतीर्थावर ९ वा अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव
पाथर्डी -प्रतिनिधी
आजचा अक्षय तृतीयेचा दिवस हा भगवान ऋषभदेवांच्या वर्षीतप पारण्याची महान परंपरा सांगणारा दिवस आहे भगवान ऋषभदेवांच्या तेरा महिन्यांच्या कठोर तपाची सांगता श्रेयांसकुमारच्या ईक्षुरस (उसाचा रस) या आहारदानाने झाली. हीच तप व आत्मआराधना सांगणारी महान परंपरा आजही वर्षीतप करणारे तपस्वी पुढे चालवत आहेत.
श्रेयांस कुमार यांना त्यावेळी पडलेल्या तीन स्वप्नांचा अर्थ जाणुन घेत आजच्या काळात ते सर्वांनी अंगिकारून कर्म करावे. तप, आत्मसाधना व उत्तम चारित्र्य याद्वारे प्रत्येकाने आपले जीवन समृद्ध करावे. वर्षीतप करणारे तपस्वी अभिनंदनास पात्र असून या तपस्वी नी या तपा बरोबर आंतरिक तप करून आत्मकल्याण साधावे. असे आवाहन जैन साध्वी परमपूज्य प्रथमदर्शनाजी महाराज साब यांनी केले. त्या चिचोंडी येथील वर्षीतप पारणा महोत्सवात बोलत होत्या.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची जन्मभूमी चिचोंडी येथील आनंद तीर्थ याठिकाणी यावर्षी नवव्या अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या महोत्सवासाठी जैन साध्वी परमपूज्य मंगलज्योतीजी, पूज्य प्रथमदर्शनाजी, पूज्य अरोहीदर्शनाजी, पूज्य रश्मीदर्शनाजी,आदी जैनसाध्वीसह गुरू आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सुराणा, विलास कटारीया, रविभाऊ नहार, संतोष शेटीया, नितीन बाफना, संजय गुगळे, श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, पिंटुशेठ परमार, चंदन कुचेरिया, अनिल खाटेर, योगेश बोरा, सुधिर शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी भक्तामर स्तोत्र अनुष्ठानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जैन स्थानकातून तपस्वींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये ढोल पथक, लेझीम पथकासह पारंपारिक वेशभूषेतील महीलांचे गरबा नृत्य पथक सहभागी झाले होते. यावेळी आनंदतीर्थाचे प्रणेते, उपाध्याय पूज्य प्रविणऋषीजी महाराज यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन करून तपस्वींना शुभेच्छा दिल्या.
कु. नेहा बाफना व पूज्य रश्मी दर्शनाजी यांनी सुमधुर आवाजामध्ये तपस्वी अभिनंदन गीत सादर केले.
यावेळी बोलताना सतीश सुराणा यांनी सांगितले की, २०१४ साली आनंद तिर्थावर सुरु केलेल्या या वर्षीतप पारणा महोत्सवाने आज स्थानकवासी परंपरेमध्ये मोठे स्थान मिळवले असून अनेक ठिकाणी आता वर्षीतप पारणा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे हेच या उपक्रमाचे यश आहे.
या तीर्थावर भविष्यातही असेच मोठमोठे उपक्रम हाती घेण्यात येतील. जे जैन परंपरेमध्ये इतिहास घडवतील. आनंद तीर्थावरून सकल जैन समाजाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे उपक्रम परमपूज्य प्रविण ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने राबवले जातील. ते उपक्रम सर्व जैन समाजाला वेगळी दिशा व संदेश देणारे ठरतील.
या वर्षीतप पारणा महोत्सवामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तपस्वी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच या कार्यक्रमासाठी भाविकही मोठ्या संख्येने जमले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन चेन्नई येथील केवलचंदजी, जवरीलालजी बरमेचा परिवार, आनंद तीर्थ परिवारा च्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पटवा यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष सेठिया यांनी मानले.
Tags :

