महाराष्ट्र
689
10
शेवगाव तालुक्यातील 'या' गावात चोरट्यांची दहशत कायम
By Admin
शेवगाव तालुक्यातील 'या' गावात चोरट्यांची दहशत कायम
अर्बन बँकेचे कुलूप तोडून चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात चोरट्यांची दहशत कायम आहे. बोधेगाव येथील लाडजळगाव फाट्यानजीक राहणारे व्यावसायिक रामेश्वर पोटभरे यांच्या घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे सुमारे चार तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविले.
दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी ग्रामदैवत श्री बोधेश्वर महराजांच्या पालखीचा उत्सव साजरा केला जातो. शेवटचा सोमवार असल्याने रामेश्वर पोटभरे आणि त्यांचे वडील महादेव पोटभरे हे पहाटे तीनच्या दरम्यान पालखी सोहळ्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले. घरात रामेश्वर पोटभरे यांच्या पत्नी मंडाबाई, आई गंगूबाई, मुलगा यशराज झोपलेले होते. चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. हॉलमधील कपाटाचे लॉकर गजाने तोडले. त्यात काही मिळाले नाही. त्यानंतर चोरट्यांनी स्वयंपाक घरात प्रवेश करून मांडणीवर ठेवलेल्या डब्यातील चार तोळे सोन्याचे दागिनेे घेऊन पोबारा केला.
घटनेचे वृत समजताच बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे उमेश गायकवाड, धोत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील विश्वासनंद मल्टिस्टेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद झाले आहेत. सुमारे सहा चोरटे घरात जाताना व 20 मिनिटांनी परत बाहेर येताना त्यात स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहेत.रामेश्वर पोटभरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बोधेगाव परिसरातील काही दिवसांपूर्वी गर्जे वस्ती, गमे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. आता चोरटे थेट गावात दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातवरण आहे.
अर्बन बँकेचे कुलूप तोडून चोरी
बालम टाकळी येथील साई उमंग अर्बन मल्टिस्टेट बँकेचे कुलूप तोडून इन्व्हर्टर, बॅटरी आणि दहा हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार बँकेचे उपाध्यक्ष काकासाहेब भाकरे यांनी शेवगाव पोलिसांत दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)