महाराष्ट्र
पाथर्डी - 'या' ठिकाणी पावसाळ्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक
By Admin
पाथर्डी - 'या' ठिकाणी पावसाळ्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील शेवगाव रस्ता व अन्य तीन ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगरपालिकेला दिल्यानंतर गुरुवारी (दि.9) अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त ठरला; मात्र पुरेसा पोलिस बंदोबस्त वेळेवर उपलब्ध न झाल्याने अतिक्रमण हटाव मोहीम पुढे ढकलण्यात आली.
आता पावसाळ्यानंतरच याला मुहूर्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणावर हातोडा टाकण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पोलिसांचे संख्याबळ वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अतिक्रमण कारवाई पुढे ढकलण्यात आली, तर पुरेसा पोलिस बंदोबस्त पालिकेला मिळाल्यावर कोणत्याही क्षणी ही अतिक्रणविरोधी कारवाई सुरू होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, सध्या पावसाळा सुरू झाल्याने अतिक्रमण हटाव मोहीम पावसाळ्यानंतरच सुरू होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना पावसाळ्यामुळे सध्या, तरी दिलासा मिळणार आहे.
पाथर्डी शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. नगरपालिका हद्दीतील शेवगाव रस्त्याजवळ असलेली अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावे, असे आदेश त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले असून, या आदेशानंतर पालिका प्रशासनाने अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण केली. पालिका प्रशासन सज्ज झाला खरा; परंतु पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने ही कारवाई काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली.
वाढत्या अतिक्रमणामुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. वाहतुकीला अतिक्रमणामुळे खीळ बसत आहे. पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताबाबत नगर येथे जिल्हा पोलिस कार्यालयात वाढीव पोलिस बळ मिळावे यासाठी मागणी केली आहे. नगर जिल्हा पोलिस कार्यालयाकडून पाथर्डी पोलिसांना अतिक्रमण बंदोबस्ताबाबत नुकतेच पत्र मिळाले.
प्रांतधिकारी, तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम राबवली जाणार असली, तरी शासन निर्णयानुसार पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये, असे निर्देश आहेत. त्यामुळे अतिक्रमण आता चार महिन्यांच्या कालावधीनंतर होईल, असे चिन्ह दिसत आहेत.
आता पालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
जिल्हाधिकार्यांंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण काढण्याबरोबर शहरातील इतरही अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आराखडा तयार केलेला आहे. लवकरच पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. शासनाचा निर्णय 'पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये,' असा आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पालिका प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपालिका प्रशासनाची तयारी
कारवाई मोठी असल्याने पालिका प्रशासनाने जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर, टेम्पो या सामग्री बरोबरच पालिकेतील अधिकारी, महिला-पुरुष कर्मचारी, पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपलब्ध राहून संयुक्तरित्या अतिक्रमणाची कारवाई पार पाडण्यासाठी पूर्ण नियोजन केले आहे.
Tags :
32812
10