स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा- अभय आव्हाड
By Admin
स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा- अभय आव्हाड
पाथर्डी- प्रतिनिधी
सर्वप्रथम जीवनाचे ध्येय निश्चित करा. जे ध्येय साध्य करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करा. आयुष्यात कधी कधी अपयशालाही सामोरे जावे लागू शकते. या विपरीत परिस्थितीतही आपल्या ध्येयाचा मार्ग बदलू नका. आयुष्यातील प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा अपयशाला सामोरे जावे लागेल, तेव्हा खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करा. आपल्या मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची ताकद निर्माण करा. तुम्हाला निश्चित यश मिळेल असा मौलिक संदेश पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आव्हाड बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रशांत साळवे, डॉ. भगवान सांगळे, प्रा. विजयकुमार म्हस्के, डॉ. वैशाली आहेर, डॉ. अजयकुमार पालवे, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. अशोक डोळस,अॅड. राजेंद्र मंत्री, ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड उपस्थित होते.
अभय आव्हाड पुढे म्हणाले, सध्या जग हे विचित्र अशा संक्रमणअवस्थेतून जात असून सोशल मिडिया मुळे आजची तरुण पिढी आपला बहुमुल्य वेळ गमावून बसत आहे. याचे सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिणाम जास्त होत आहेत. अपयश आल्यावर मोबाईलच्या आहारी जाऊन आजचे तरुण टोकाचे पाउल उचलतांना दिसतात. अशा वेळी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्त असणारा तरुणाच यातून सावरू शकतो, म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या यश-अपयशाला मानसिकदृष्ट्या खंबीरपणे सामोरे जावे. येणारी एक-दोन वर्षे आपण कठोर मेहनतीत घालवल्यास आपले पुढील जीवन नक्कीच सुखकर होईल. यशस्वी जीवनाचा आनंद घेत असतांना आई वडील व गुरुजनांना विसरू नका. वाणिज्य विभागात करियरच्या असंख्य संधी उपलब्ध असून त्या संधीचे सोने करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, हे विसरू नका, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी मुकुंद पोटफोडे, अंकिता शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रशांत साळवे यांनी केले. सुत्रसंचालन मोरेश्वर तारे व अमृता लोहिया तर आभार ऋषिकेश काळे यांनी मानले.