हुकूमशाही संपवून टाकणार - करुणा शर्मा
By Admin
हुकूमशाही संपवून टाकणार - करुणा शर्मा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यात सत्तेवर असलेल्या तिघाडी शासनाच्या काळात बीड जिल्ह्याची अवस्था बिहारसारखी झाली. आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकणाऱ्या नेत्याची हुकूमशाही संपवून टाकणार असल्याची टीका शिवशक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळून केली.
पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बाबूराव बडे, गणेश बडे, मच्छिंद्र सांगळे, रमेश गिरे, हनुमंत गिरे उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाल्या, की बीड जिल्ह्यात चारशे पंचाहत्तर बलात्कार झाले असून, दोन महिलांनी आत्महत्या केल्या. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून, या नियमाला धरून आता परिवर्तन होणार आहे. तिघाडी शासनाच्या काळात घराणेशाहीला थारा देत हुकूमशाही राबवली जात असून, या हुकूमशाहीच्या विरोधातील आपला लढा चालूच राहणार आहे. मी आवाज उठवते म्हणून मला धमक्या दिल्या जात असल्या, तरी या धमक्यांना मी भीक घालत नाही. उद्या मी असेल किंवा नसेलही, पण मी सुरू केलेला लढा हा चालूच राहणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फाटक्या माणसांना उमेदवारी देत मी त्यांना निवडून आणणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण कमी अन समाजकारण अधिक असणार आहे. धर्तीवर खूप पाप झाल्यानंतर श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज जन्माला आले होते. सध्याही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रांती करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नसून ही क्रांती झाल्यानंतर शांती निर्माण होणार आहे.
आता परिवर्तन अटळ
तिघाडी शासनाच्या काळात वकील, पोलिसांनाही जेलमध्ये टाकले जात आहे. जे त्याग करतात तेच इतिहास रचत असल्याने मी आगामी काळात इतिहास घडवणार आहे. हे शासन लोकांच्या हाताला काम देत नसून केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम चालू आहे. माझ्यावर झालेला अन्याय राज्यातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असून आता परिवर्तन अटळ, असे शर्मा म्हणाल्या.