महाराष्ट्र
4771
10
दहावी, बारावी प्रश्नपत्रिकेबाबत बोर्डाचा हायटेक निर्णय,
By Admin
SSC HSC Exam: दहावी, बारावी प्रश्नपत्रिकेबाबत बोर्डाचा हायटेक निर्णय, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम'चा करणार वापर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दहावी, बारावी परीक्षेत पेपरफुटी आणि उत्तरपत्रिकेत फेरफार टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका'जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम'ने सुरक्षित होणार आहे. परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका सहायक परिरक्षकाने केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रावर तो कधी पोहचला, परिरक्षक कार्यालय ते परीक्षा केंद्राच्या दरम्यान कोठे थांबला याचे ट्रॅकिंग होणार आहे.
यासह परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिका पाकिट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्यात येणार आहे. (ssc hsc exam question paper and answer sheet on gps tracking system read in marathi )
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षा २ मार्चपासून सुरु होत आहे. दहावी, बारावी परीक्षेत पेपरफुटी, गैरप्रकार अनेकदा समोर आले. कॉपीमुक्त परीक्षा, गैरप्रकार रोखण्यासाठी विविध पातळीवर शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होत असलेल्या परीक्षेत तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे.
शिक्षण मंडळाने यंदा परिरक्षक कार्यालयातून (कस्टडी) परीक्षा केंद्रावर पोहचविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे 'जीपीएस ट्रॅकिंग' होणार आहे. परिरक्षक कार्यालयातून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहचवणे त्यासह परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षक कार्यालयावर पोहचविण्याची जबाबदारी सहाय्यक परिरक्षकची(रनर) असते. त्याची नेमणूक शिक्षण मंडळाकडून केली जाते. जो इतर संस्थेतील शिक्षक, मुख्याध्यापक असतो.
परिरक्षक केंद्रांना आठ ते दहा शाळा जोडलेल्या असतात. परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी परिरक्षक केंद्र व परीक्षा केंद्र यांच्यातील अंतर पाहूण निश्चित कालावधी देण्यात आलेला असतो. साधारत: तीस मिनिटे किंवा तासभर आधी सहाय्यक परिरक्षक प्रश्नपत्रिका घेऊन निघतो. नव्या बदलामुळे सहाय्यक परिरक्षकावरील जबाबदारी वाढली आहे.
प्रत्येक नोटिंग होणार
पेपरफुटी, गैरप्रकार थांबविण्यासाठी मंडळ विविध उपाययोजना करीत असल्याचे सांगण्यात येते. जीपीएस ट्रॅकिंग त्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. सहाय्यक परिरक्षकाने परिरक्षक कार्यालयातून किती वाजता प्रश्नपत्रिका स्विकारल्या, केंद्र संचालकाच्या ताब्यात किती वाजता दिल्या. त्याला येण्यासाठी साधारणत: किती वेळ लागला. परिरक्षक कार्यालयातून निघाल्यापासून परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत कोठे कोठे थांबला या सर्वाच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरीता जी सिस्टिम आहे. तशीच परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका पोहचविण्यासाठीही सिस्टिम असणार आहे.
यासह परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुखाला प्रश्नपत्रिका स्वीकारलेल्या वेळेची नोंद ठेवावी लागेल. उत्तरपत्रिका ताब्यात देतानाही वेळेची नोंद घ्यावी लागेल. यासह परीक्षा कक्षात पर्यवेक्षकाला प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकिट देताना कक्षातील एका विद्यार्थ्याच्या स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे. याचेही छायाचित्रिकरण सहाय्यक परिरक्षकाला करण्याबाबत सुचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. पर्यवेक्षकाला अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद, प्रश्नपत्रिका तातडीने केंद्र संचालकाच्या ताब्यात द्याव्या लागतील. त्यासह केंद्रप्रमुखांना तातडीने, केंद्रावरील परीक्षार्थींची उपस्थिती, अनुपस्थितीची ऑनलाइन नोंदणी केली मंडळाला कळवावी लागणार आहे.
सहायक परिरक्षकाची जबाबदारी वाढली
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक(रनर) यांनी प्रवासादरम्यान जीपीआरएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे, अशा सुचना मंडळाने सहाय्यक परिरक्षकांना दिल्या आहेत. मंडळ या सर्वांचे ट्रॅकिंग करणार आहे. अशा परिरक्षकांची नेमूणक मंडळाकडून करण्यात आली असून त्यांना याबाबत कल्पना देण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.
Tags :

