कांदा चाळीचे अखेर 'इतक्या' शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
By Admin
कांदा चाळीचे अखेर 'इतक्या' शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
अहमदनगर- प्रतिनिधी
कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८-१९ या वर्षात कांदा चाळीची उभारणी केली. मात्र कृषी विभागाने अपात्र केलेल्या कांदा चाळी पात्र करत अखेर ८९ शेतकऱ्यांनी ६९ लाख ३ हजार रुपयाचे अनुदान मिळाले आहे. याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण केले.
नगर जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कांदाचाळ उभारणी केली. मात्र, जिल्हाभरातील १४७ शेतकऱ्यांच्या कांदाचाळी कृषी विभागाने अपात्र केल्या. शेतकऱ्यांनी सातत्याने कृषी विभागाशी संपर्क केला असता त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नेवासा तालुक्यातील अनिल विधाते, ॲड.
पांडुरंग औताडे, रमेश जगताप, गीताराम रोडगे, नवनाथ मते, बापूसाहेब घोलप, दशरथ चव्हाण, विनायक विधाते, रवींद्र होले यांच्यासह शेतकऱ्यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी नगर येथे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयासमोर उपोषण केले होते. सुरवातीला उपोषणाकडे कृषी विभागाने दुर्लक्ष केले,मात्र अक्रमक शेतकरी पाहून दखल घ्यावी लागली होती.
कृषी विभागाने पुन्हा कांदा चाळीची तपासणी करत १४७ पैकी ८९ कांदाचाळी पुर्नतपासणी पात्र केल्या व त्याचे ६९ लाख ३ हजार रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे. पात्र कांदाचाळीत नेवासा तालुक्यात ३३ कांदा चाळी पात्र झाल्या असून २१ अपात्र झाल्या.
दरम्यान, शेवगाव तालुक्यात ४१ कांदाचाळी पात्र तर १५ अपात्र झाल्या आहेत. जिल्हाभरातील एकूण १४७ पैकी ५८ अपात्र केलेल्याकांदा चाळीला मात्र अनुदान मिळणार नाही असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
कारवाईचे काय?
कांदाचाळ उभारुनही जाणीवपुर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरुन कांदा चाळी अपात्र केल्या. त्यानंतरच्या तपासणीत मात्र त्याच कांदाचाळी पात्र केल्या. केवळ पैसे देण्यास विरोध केल्यानेच शेतकऱ्यांना वेठीस धरुन कांदाचाळ तपासणीच्या नावाखाली अपात्र केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले होते. शेतकऱ्यांना अनुदान मिळाले मात्र शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर दोन पाच महिन्यानंतरही कारवाई केलीच नाही.