पाथर्डी तालुक्यातील परीसरात घरफोड्या,रस्तालूट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात घरफोडी व रस्तालूट, अशा वेगवेगळ्या दोन घटना घडल्या असून यामध्ये सुमारे एक लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोर्यांसह घरफोड्यांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील अनिल विश्वनाथ सुरासे वय 44 वर्षे रा. सुरसवाडी (बोरसेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे की,अजिंक्यतारा साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेलेले असताना बुधवारी सकाळी 11 वाजता आई यशोदाबाई हिने सुरसवाडी येथे घराच्या दाराला कडील कुलूप लावून शेतात गेली होती.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलगी आरती हिने फोन करून सांगितले की आज मी माणिक दौंडी येथे शाळेत गेले शाळा सुटल्यानंतर घरी परत आले असता घराचा कडी कोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व वीस हजार रुपयांची रोख रक्कम असा 86 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. दुसरी फिर्याद संपत नंदराम वाणी रा. बर्हाणपूर यांनी दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यात जय मातादी स्टोन क्रशरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो.
बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास स्टोन क्रशरवरून घरी जात असताना साकेगाव जवळ हनुमान वस्ती जवळ शेवगाव पाथर्डी रोडला लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून पाठीमागून तिघेजण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. मोटार सायकल आडवी लावून त्यांनी खिशातील तीन हजार रुपये व मोबाईल बळजबरीने काढून घेतला. दरम्यान, काही दिवसांपासून पाथर्डी तालुकयांत चोर्या आणि रस्तालुटीच्या वाढलेल्या घटनेमुळे पाथर्डी शिवारात दहशत पसरली आहे.