जिल्हाधिकारी कार्यालय इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्याचा प्रयत्न - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
अहमदनगर- प्रतिनिधी
प्रशासकीय दृष्ट्या सर्वाधीक महत्वाच्या असलेल्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याचे सर्व काम पूर्ण होऊन उद्धाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
श्री. थोरात आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे आज अहमदनगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, सा.बां.
विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची यावेळी उपस्थिती होती.
श्री.थोरात हे मागील काळात महसूलमंत्री असतानाच नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामास मंजुरी मिळून त्याची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात २८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, मधल्या काळात इमारत बांधकाम थंडावले होते. ते काम आता जवळपास पूर्णत्वास गेले असून इमारतीतील फर्निचर तसेच इतर अनुषंगिक कामे होत आहेत.
त्यासाठीचा आवश्यक निधीही उपलब्ध होऊन महाराष्ट्र दिनापर्यंत सर्व बाबींची पूर्तता होईल आणि नवीन अत्याधुनिक, देखणे असे जिल्हाधिकारी कार्यालय तयार होईल, असा विश्वास श्री. थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी या नूतन इमारतीची पाहणी केली. प्रत्येक मजला त्यांनी पाहिला. कामाचे स्वरुप आणि दर्जा, प्रलंबित कामांसाठी लागणारा वेळ, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आदींची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी यांच्याकडून घेतली. प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.