छोटी बचतही भविष्यातील मोठी आर्थिक गरज भागवते: क्रांतीदल प्रमुख विष्णुपंत पवार
इंदिरानगर भागातील मोरया प्रतिष्ठानच्या बचत गटाची स्थापना
पाथर्डी प्रतिनिधी:
सावकारी कर्ज व अव्वाच्या सव्वा व्याज दरच्या चक्रव्यूहात अडकायचे नसेल तर बचतीचे महत्त्व ओळखले पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार असल्याने आज सुरु केलेला बचतगट सक्षमपणे चालवावा. आजची छोटी बचतही भविष्यातील मोठी आर्थिक गरज भागवते, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य तथा क्रांतीदल प्रमुख विष्णुपंत पवार यांनी केले. शिवजयंती च्या मुहूर्तावर शहरातील इंदिरानगर भागातील मोरया प्रतिष्ठानच्या बचतगटाची स्थापना व शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून श्री पवार बोलत होते.
यावेळी बचतगट चळवळीतील नेत्या भारतीताई असलकर, सामाजिक कार्यकर्ते इजाजभाई शेख, अनिल खाटेर, उद्योजक व बचतगटाचे अध्यक्ष दत्ता डिगे आदी उपस्थित होते.भारती असलकर, अनिल खाटेर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन तसेच फटाक्यांची आतषबाजी करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महेश अंतरकर, संतोष बर्डे, अमन कदम, सोमा चव्हाण, सचिन खारगे, मोरया युवा स्वयंसहायता बचत गटाचे सर्व सदस्य व इंदिरानगर येथील रहिवासी उपस्थित होते.
प्रास्ताविक अमोल खोले, स्वागत शैलेश उगार, सुत्रसंचलन सुखदेव मर्दाने तर आभार कपिल वेलदोडे यांनी मानले