बाबुजी आव्हाड आर्चरी अकॅडमीच्या तिरंदाजांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
नुकत्याच अहमदनगर येथे संपन्न झालेल्या सब ज्युनियर जिल्हास्तरीय तिरंदाजी (आर्चरी) स्पर्धेमध्ये बाबुजी आव्हाड आर्चरी अकॅडमीच्या तिरंदाजांनी नेत्रदीपक यश संपादन केले. १० वर्ष वयोगटात मुलांमध्ये अंश काळोखे याने रौप्य पदक तर मुलींमध्ये ज्ञानदा फासे हिने कांस्यपदक पटकावले. १३ वर्ष वयोगटांमध्ये निशांत जाधव याने सुवर्णपदक, आदित्य एकम रौप्यपदक, तर वेदांत नागरगोजे याने कांस्यपदक पटकावले. १५ वर्ष वयोगटात स्पंदन दहिफळे याने चतुर्थ क्रमांक मिळवला.
या सर्व खेळाडूंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा संघात निवड झाली आहे. त्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख, प्रा. सचिन शिरसाट, अकॅडमीचे प्रशिक्षक साईनाथ ढाकणे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य प्रा. डॉ. बबन चौरे तसेच अहमदनगर जिल्हा आर्चरी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी रोकडे व सचिव अभिजीत दळवी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.